जल जीवन मिशन अंतर्गत विशेष मोहीम यशस्वी करावी-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील
अलिबाग, दि.27 (जिमाका):- जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हात दि.25 जुलै 2022 पासून “हर घर जल उत्सव” विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दि.12 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्याकरिता रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.
जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांशी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. मुबलक शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा होण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या भागीदारीतून राबविली जात आहे. या योजनेत शंभर टक्के वैयक्तिक व संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणाऱ्या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, ग्रामसभांमध्ये “हर घर जल” घोषित करणे, त्याबाबतचा ठराव करणे, त्यानंतर गावात समारंभ घेऊन हर घर जल उत्सव साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जनजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करणे, लोककलाकारांचा सहभाग घेऊन जनजागृती करणे, पाणी गुणवत्ता अंतर्गत फिल्ड टेस्ट किट (FTK) याद्वारे पाणी तपासणीसाठी विशेष मोहीम राबविणे, हर घर जल उत्सवामध्ये गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा, अंगणवाडी, इत्यादी सर्व घटकांना सहभागी करून घेणे, संस्थात्मक नळ जोडणीमध्ये, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रासह सार्वजनिक ठिकाणी नळ जोडणी देणे इत्यादी बाबत सूचना आहेत.
या उपक्रमाबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग यांना सूचना देण्यात आल्या असून सर्वांनी हर घर जल उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.
या उपक्रमाचे नियोजन प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन) तथा पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले आहे.