सिडकोच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेसाठी रु. 5 हजार कोटींचा पतपुरवठा प्राप्त
सिडको महामंडळाकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून रु. 5 हजार कोटींचा पतपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर महागृहनिर्माण योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या घरांच्या बांधकामास गती मिळून सर्वसामान्यांचे परवडणाऱ्या दरातील हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.
"स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे महागृहनिर्माण योजनेचे काम नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महागृहनिर्माण योजनेस 6% व्याज दराने पतपुरवठा मंजूर करण्यात आला असून एखाद्या सार्वजनिक उपक्रम संस्थेस इतक्या कमी व्याज दराने पतपुरवठा मिळणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. सदर महागृहनिर्माण योजना आपल्या देशातील व जगातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना ठरेल यात शंका नाही."
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सिडकोसारख्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या महामंडळास स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फे केवळ 6% व्याज दराने पतपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. एखाद्या सार्वजनिक उपक्रम संस्थेस इतक्या कमी व्याज दराने पतपुरवठा मिळणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. भरीव पतपुरवठा मंजूर करून स्टेट बॅंक ऑफ इंडियानेही या प्रकल्पाच्या विश्वासार्हतेवर आणि व्यवहार्यतेवर मान्यतेची मोहोर उमटवली आहे. याचा निश्चितच सदर प्रकल्पास वेग देण्यास सकारात्मकदृष्ट्या उपयोग होणार आहे.
महागृहनिर्माण योजना प्रकल्पाकरिता रु. 30,000 कोटींचा खर्च अंदाजित असून त्यापैकी रु. 4,000 कोटींचा खर्च हा सिडकोकडून, रु. 5,000 कोटी बॅंकेच्या पतपुरवठ्याद्वारे आणि उर्वरित खर्च हा प्रकल्पातील अंतर्गत उत्पन्न स्त्रोतांद्वारे करण्यात येणार आहे.
सिडकोने या योजनेच्या मार्केटिंग आणि ग्राहक संबंध व्यवस्थापनासाठी एका खाजगी एजन्सीची नियुक्ती केली आहे, जेणेकरून संपूर्ण विक्री प्रक्रियेदरम्यान आणि विक्री पश्चात सेवा सुलभतेने प्रदान करण्यात येतील. महागृहनिर्माण योजनेसाठी अशा प्रकारचे पाऊल उचलणारे सिडको हे पहिले सरकारी प्राधिकरण ठरले आहे.
नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये सिडकोतर्फे राबवण्यात येणारी ही महागृहनिर्माण योजना ‘परिवहन केंद्रीत विकास’ या संकल्पनेवर आधारित आहे ज्यात 1,12,500 सदनिकांचा समावेश आहे. यातील प्रथम टप्प्यामध्ये 23,500, द्वितिय टप्प्यामध्ये 67,000 आणि तृतिय टप्प्यामध्ये आणखी 22,000 सदनिकांचा समावेश आहे. यापैकी 35% सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी आहेत तर 15% सदनिका अल्प उत्पन्न गटांसाठी व उर्वरित सदनिका खुल्या घटकासाठी विक्रीसाठी उपलब्ध असतील.
जागांची उपलब्धता, आर्थिक नियोजन, वैधानिक परवानग्या, प्रकल्प संनियंत्रण यंत्रणा, या सर्व आघाड्यांवर यशस्वीपणे काम करून सिडकोने महागृहनिर्माण योजनेची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला. या महागृहनिर्माण योजनेतील टप्पा-1 मधील घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून टप्पा-2 मधील घरांचे बांधकामही वेगाने सुरू आहे. योजनेच्या टप्पा-3 मधील घरांच्या बांधकामासही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
महागृहनिर्माण योजनेतील गृहसंकुले ही नवी मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणार आहेत. या गृहसंकुलांना सध्या अस्तित्वात असलेल्या हार्बर, ट्रान्स-हार्बर रेल्वे व प्रगतीपथावर असणाऱ्या नेरूळ-उरण या रेल्वे मार्गांद्वारे आणि राज्य महामार्गांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. यामुळे या गृहसंकुलांतील रहिवाशांना मुंबई महानगर प्रदेशातील विविध व्यापारिक क्षेत्रांपर्यंत (बिझनेस डिस्ट्रिक्ट) कराव्या लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेत लक्षणीय बचत होणार आहे.