महिला वाहतूक पोलिसाचा मोबाईल फोडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिले विरोधात गुन्हा दाखल
नाम साधर्म्याचा फायदा घेऊन शासनाची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रयत्न, सहा जणांवर गुन्हा दाखल
नवीन पनवेल : भूसंपादनाच्या मोबदल्यात नुकसान भरपाई म्हणून मिळणारी रक्कम हडप करण्यासाठी खोटे व बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून नाम साधर्म्याचा फायदा घेऊन शासनाची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू मोरेश्वर कडू (मोरेश्वर दिनकर कडू), किरण विष्णू कडू, (चिंध्रण), मेघा जगनाडे अशी आरोपींची नावे आहेत.
उपविभागीय अधिकारी, पनवेल त्यांच्या कार्यालयात संमतीने जे शेतकरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात जमिनी द्यायला तयार आहेत त्यांच्याकडून एमआयडीसी संपादनाचा मोबदला मिळण्यासाठी अर्ज घेतला जातो. त्यास आधारकार्ड, पॅनकार्ड, ओळख देणाऱ्याचे आधारकार्ड, अर्जदाराचे संमतीपत्र, बँक खात्याचा तपशील, जमिनीचा तपशील हे घेतले जातात. अर्जदार विष्णू मोरेश्वर कडू (मोरेश्वर दिनकर कडू) राहणार चिंध्रण यांनी सर्वे नंबर 47/3 या जमीन मिळकतीपोटी संपादनाचा मोबदला मिळावा यासाठी 12 ऑगस्ट 2021 रोजी अर्ज केला. त्यानंतर मूळ जमिनीचे मालक अर्जदार यांनी याच जमीन मिळकतीच्या मोबदला बाबत 30 सप्टेंबर 2019 रोजी विष्णू मोरेश्वर कडू (मोरेश्वर धोंडू कडू) राहणार चिंध्रण यांनी हरकत अर्ज केला. जमीन मिळकतीच्या संपादनापोटी मिळणारी नुकसान भरपाई त्यांच्या नावे अन्य त्रयस्थ व्यक्ती हडप करत असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार महेंद्रबेलदार यांनी अर्जासोबत जोडलेल्या सह पत्रांची पाहणी केली असता त्यामध्ये अर्जदार विष्णू मोरेश्वर कडू (मोरेश्वर दिनकर कडू) यांनी अर्जामध्ये अर्जदाराचे नाव न लिहिता फक्त विष्णू मोरेश्वर कडू अशी स्वाक्षरी दिसून आली. यावेळी प्रतिज्ञा पत्रामध्ये ओळख म्हणून मेघा जगनाडे यांनी सही केली आहे.
त्यांनी दिलेल्या झेरॉक्समध्ये वडिलांचे नाव मोरेश्वर दिनकर कडू असे आहे. त्यानंतर हरकत अर्जनंतर शहानिशा व पडताळणी करण्यासाठी मंडळ अधिकारी मोरबे यांच्याकडून शोध अहवाल प्राप्त केला. यावेळी सदरची मिळकत मोरेश्वर धोंडू कडू यांचा मुलगा हरकत अर्जदार विष्णू मोरेश्वर कडू यांची असल्याचे समजले. त्यामुळे मोरेश्वर दिनकर कडू यांचा मुलगा विष्णू मोरेश्वर कडू याने वस्तुस्थिती माहीत असताना देखील भूसंपादनाची रक्कम हडप करता यावी या हेतूने त्यांचा मुलगा किरण विष्णू कडू व इतर तीन तसेच ऍफीडेव्हीट मध्ये ओळख देणाऱ्या मेघा जगनाडे यांनी संगनमत करून खोटी कागदपत्रे तयार केली. त्यामुळे विष्णू मोरेश्वर कडू (मोरेश्वर दिनकर कडू), किरण विष्णू कडू (दोन्ही राहणार चिंध्रण) व मेघा जगनाडे व इतर तीन यांनी संगनमताने जमीन मिळकतीच्या भूसंपादनाच्या मोबदल्यात नुकसान भरपाई म्हणून मिळणारी रक्कम हडप करण्यासाठी खोटे व बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले. व नाम साधर्म्याचा फायदा घेऊन शासनाची दिशाभूल वा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.