नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचा दौरा जाहीर
नवी मुंबई, दि. 18 :- नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी , व्हीजे एनटी ) आरक्षणासाठी घटित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती , ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास ओबीसी, व्हीजे एनटी ) आरक्षण देण्यासठी मा . सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे . महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे . या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे निवेदन करण्यात आले आहे . यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा . समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे . शनिवार दि. २१ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे भेट देतील. रविवार दि. २२ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद तर याच दिवशी सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे भेट देतील. बुधवार 25 मे 2022 रोजी दुपारी 2.30 ते 4.30 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, कोंकण भवन, नवी मुंबई येथे भेट देतील. शनिवार दि. २८ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती तर याच दिवशी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे भेट देतील.
या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी. तसेच यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन या समर्पित आयोगाचे सदस्य सचिव पंकज कुमार (भा.प्र.से.) यांनी केले आहे.