प्रख्यात 'इंडिया आर्ट फेस्टिव्हल'चे दशकपूर्ती पर्व, पँडेमिकनंतर प्रथमच वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत भव्य आयोजन!

प्रख्यात 'इंडिया आर्ट फेस्टिव्हल'चे दशकपूर्ती पर्व, पँडेमिकनंतर प्रथमच वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत भव्य आयोजन!



५५० कलाकार आणि ४५ कलादालनांकडून ४५०० कलाकृतींचे सादरीकरण, २६ ते २९ मे दरम्यान प्रदर्शन


 मुंबई(प्रतिनिधी)- स्थानिक व जागतिक पातळीवरील कलादालने आणि कलाकारांचा समावेश

* प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात संवाद घडविण्यासाठी 'आर्टिस्ट पॅव्हेलिअन'

* निसर्ग चित्रे, व्यक्तिचित्रे, अध्यात्मिक कलाकृती, वारली कला, शिल्पकृती आणि कलांची पर्वणी

*23  मे २०२२ मुंबई*  कलाकार आणि कलारसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या प्रख्यात 'इंडिया आर्ट फेस्टिव्हल'चे दशकपूर्ती पर्व यंदा साजरे होत आहे. पँडेमिकनंतर प्रथमच वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत २६ ते २९ मे सकाळी ११ ते सायंकाळी ७:३० दरम्यान याचे आयोजन करण्यात आले आहे.  स्थानिक व जागतिक पातळीवरील कलादालने आणि कलाकारांचा समावेश असून ५५० कलाकार आणि ४५ कलादालनांकडून ४५०० कलाकृतींचे सादरीकरण करण्यात येईल. डिस्कवरी ऑफ इंडीया बिल्डींगचा तळ मजला व दुसऱ्या मजल्यावर १५० बुथ मध्ये प्रदर्शन भरविले जाईल.  

४० शहरांमधील २५० स्वतंत्र कलाकार या महोत्सवात सहभागी होत आहेत. या प्रदर्शनात तैलचित्रे, अ‍ॅक्रिलिकमधील चित्रे, जलरंगातील चित्रे इत्यादी पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे शिल्पे आणि ओरिजिनल प्रिंट्स, निसर्गचित्रे, फिगरेटिव्ह्ज, अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्रे या शोमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतील. या ठिकाणी शहरातील दृश्ये, समुद्राचे रंग, शहरी व ग्रामीण प्रसंग, व्यक्तीचित्रे, न्यूड्स, सेमीन्यूड्स, धार्मिक कला, म्युरल्स, पारंपरिक चित्रे, पिचवाई कला, वारली कला इत्यादी कलाकृती पाहायला मिळणार आहेत. पँडेमिकमुळे मंदीत असलेले उद्योगजगत आता सावरले असून कलांसाठीची बाजारपेठ आर्ट फेस्टिव्हलमुळे चित्र-शिल्पकरांना दोन वर्षांनंतर उपलब्ध होत आहे. 

“उद्योन्मुक, प्रस्थापित आणि दिग्गज कलाकारांनी घडविलेल्या समकालीन कलाकृती घेण्यासाठी इंडिया आर्ट फेस्टिव्हल हा प्रमुख स्रोत असून तो पँडेमिकनंतर पुन्हा कला रसिकांसमोर येत आहे. कलारसिक आणि कलाग्राहकांची संख्या मुंबई, बंगळुरू आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात असून इंडिया आर्ट फेस्टिव्हलच्या वार्षिक आवृत्ती मुंबईशिवाय दिल्ली व बंगळुरू येथे होत असून आर्ट फेस्टीव्हलच्या या महानगरांमधील वाढीसाठी ते मुलभूत कारण आहे.”, असे 'इंडिया आर्ट फेस्टिव्हल'चे संचालक राजेंद्र पाटील म्हणाले. 

प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात संवाद घडविण्यासाठी एक आर्टिस्ट पॅव्हेलिअन तयार करण्यात आले आहे. कला कशा प्रकारे घडते हे कलारसिकाला समजावे आणि त्यांच्या दृष्टिकोनाव्यतिरिक्त कोणत्या दृष्टिकोनातून कला पाहिली जाते हे कलाकारांना समजावे हे या पॅव्हेलिअनचे उद्दिष्ट आहे. या वर्षीच्या आर्टिस्ट पॅव्हेलिअनमध्ये लँडस्केप्स, अॅबस्ट्रॅक्ट्स, धार्मिक व आध्यात्मिक पेंटिंग्स आणि वैशिष्ट्यपूर्ण फिगरेटिव्ह कलांच्या माध्यमातून काही अनोळखी कलाकार आपली अभिव्यक्ती सादर करणार आहेत. या माध्यमातून कलाकार आणि ग्राहक अशा दोघांनाही लाभ होत असून अशा प्रकारचे स्वातंत्र्य एखाद्या महोत्सवात क्वचितच प्राप्त होते.

या महोत्सवात, भन्नाट अंतर्दृष्टी असलेले कलाकार गैलरी स्प्लाश, क्युरेटरस् आर्ट, लेक्सीकॉन आर्ट गैलरी, ग्रेस्केल, स्टुडियो ३ आणि ऱ्हिदम आर्ट या कलादालनांनी सादर केले आहेत. त्यात नामवंत चित्रकार मनु पारेख, लालू प्रसाद शॉ, परेश मैती, सतीश गुप्ता, सीमा कोहली, गुरुदास कामत, बी प्रभा, जतीन दास, जोगेन चौधरी व जवळपास १०० प्रख्यात चित्र-शिल्पकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. काही तरुण चित्रकार नागेश घोडके, विवेक कुमावत, आनंद पांचाल, दिनकर जाधव, सुबोध पोद्दार, मिठु बासू, अशोक राठोड, ऋता इनामदार, नलिनी जोशी आणि अशा अनेकांच्या कलावंतांच्या कलाकृती आहे.

गॅलरी विभागात सिंगापूर येथील ग्नानी आर्ट्स व ऑलिव्ह आर्ट गैलरीसारख्या आंतरराष्ट्रीय कलादालनांमधील कलाकृती पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे आर्ट नोव्ह्यू, दृष्यय आर्ट गैलरी, एमिनंट आर्ट गॅलरी, गॅलरी व्हिजन आर्ट, मेराकी आर्ट हाऊस, निफा फाइन आर्ट अ‍ॅकेडमी, स्टुडियो ७ सेव्हन,  गैलरी पायोनिअर, उचान इत्यादी नवी दिल्ली येथील कलादालाने या महोत्सवात सहभागी होणार आहेत. आर्टदेश फाउंडेशन, आर्टव्हिस्टा, डोल्ना द मूव्हमेंट, ग्रेस्केल, म्रिया आर्ट्स, ऱ्हिदम आर्ट, द बॉम्बे आर्ट सोसायटी आणि स्टुडीओ ३ गॅलरी या मुंबईतील गॅलरी आपल्या उत्तम कलाकारांच्या कलाकृती या ठिकाणी सादर करणार आहेत. हैदराबाद येथील स्नेहा आर्टस्‌, अगरतला येथील कलाभवन आर्ट गैलरी, उदयपूर येथून बियोंड स्क्वेअर, शांतिनिकेतन येथी रबी आर्ट, बंगळुरू येथील चार्वी आर्ट गैलरी आदि कलादालने सहभागी होत आहेत.