माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नेमणुक
मुंबई, दि. 4 : - भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते, सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे तमाम माथाडी कामगार, मराठा समाज आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांचेकडून या नेमणुकीबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे, *यानिमित्ताने माथाडी,नवीमुंबई येथे मंगळवार दि. 05 एप्रिल रोजी नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे भव्य स्वागत,सत्कार व शुभेच्छा समारंभ आयोजित केला आहे.*
ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक व माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जतन करीत त्यांची ध्येय-धोरणे व स्वप्न उराशी बाळगून त्यांचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे धडाडीने कार्य करीत आहेत, त्यांच्या सामाजिक, राजकिय व कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा बहुमान करीत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणुक केल्याचे नियुक्तीपत्र दिले, या पदाची जबाबदारी पार पाडत असताना नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे सामाजिक, राजकिय व कामगार क्षेत्रातील योगदान तसेच स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा लाभलेला वारसा व शिकवण उपयुक्त पडेल असे नियुक्ती पत्रात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.
स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी कष्टक-यांची ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी केली, मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतिने लढा उभा केला, या मागणीसाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांच्या दुःखद निधनानंतर त्यांचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे नेतृत्व करीत आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या चळवळीमध्ये ते सक्रिय सहभागी आहेत. सन 2018 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला. नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे दौरे करुन मराठा युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतिने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन हजारो युवकांना उद्योजक करण्याचे कार्य केले. सन 2019 मध्ये लोकसभेची निवडणुक नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी लढविली, त्यावेळी त्यांना महामंडळाचा राजिनामा द्यावा लागला, परंतु निवडणुकी नंतर पुन्हा त्यांची देवेंद्रजी फडणवीस यांनी अध्यक्ष पदी नेमणुक केली.
ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ ही एक स्वतंत्र व बलाढ्य अशी ताकद असून, या चळवळीला सर्वच नेत्यांनी आजपर्यंत पाठबळ दिले आहे, सन 2016 मध्ये नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती मेळाव्यास आणले, त्यानंतर माथाडी कामगार चळवळ, माथाडी कायदा, माथाडी बोर्ड, संलग्न संस्था याबाबतीतील माहिती तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मिळाली, ज्या-ज्या वेळी नरेंद्र पाटील हे कामगारांचे न्याय प्रश्न त्यांचेकडे घेऊन गेले त्या-त्या वेळी कष्टाची कामे करणा-या माथाडी कामगारांच्या व्यथा समजून घेऊन त्यांना न्याय दिला, नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांचेशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माथाडी कामगार चळवळ व माथाडी कामगारांच्या आणि नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले.
गुढीपाडवा या सणाला हिंदु संस्कृतीमध्ये अत्यंत वेगळे महत्व आहे, याच दिवशी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे, ही जबाबदारी समर्थपणे व निष्ठेने पेलण्याची तसेच तळागाळातील समाज, मराठा बांधव, माथाडी कामगार यांना न्याय मिळण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी सदैव कार्यरत रहाण्याची ग्वाही नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली आहे.