नवी मुंबई महानगरपालिका-
*8591256150 मोबाईल नंबरव्दारे 'डेब्रिज ऑन कॉल'ची सुविधा उपलब्ध*
*महानगरपालिकेच्या सी अँड डी वेस्ट प्रकल्पाचा उपयोग करून शहर स्वच्छतेत योगदान देण्याचे आवाहन*
'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये 10 ते 40 लक्ष लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई हे देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकित झाले आहे. त्यानुसार 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला सामोरे जात असताना लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.
यामध्ये निर्मितीच्या ठिकाणीच कच-याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा 3 प्रकारे वर्गीकरण करणे अनिवार्य असून बांधकामे आणि पाडकाम कचरा (C & D Waste) व्यवस्थापन नियम 2016 अन्वये महानगरपालिका क्षेत्रात नवीन बांधकाम करताना व जुने बांधकाम पाडताना निर्माण होणा-या बांधकाम राडारोडा (C & D Waste) याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे बंधनकारक आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने तुर्भे येथील टिटीसी एमआयडीसी क्षेत्रात ल्युब्रिझॉल कंपनीच्या मागे सर्व्हे क्र. 378 येथे शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी 'बांधकामे आणि पाडकाम कचरा (C & D Waste) प्रक्रिया प्रकल्प' कार्यान्वित केलेला आहे.
*नवी मुंबई शहराची स्वच्छ व सुशोभित प्रतिमा कायम राखण्यात नवी मुंबईकर नागरिकांचा सर्वात मोठा सहभाग असून महापालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांच्या अथवा बांधकाम व्यवसायिकांच्या किंवा संस्थांच्या बांधकाम व पाडकामात निर्माण होणारा बांधकाम राडारोडा (C & D Waste) त्यांनी महानगरपालिकेच्या प्रकल्पापर्यंत प्रक्रिया करण्यासाठी स्वखर्चाने वाहतुक करून आणावा व नवी मुंबई शहर स्वच्छतेत आपले अनमोल योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
*तथापि बांधकाम राडारोडा महानगरपालिकेच्या सी अँड डी वेस्ट प्रकल्पापर्यंत वाहून नेण्याची व्यवस्था ज्या नागरिकांकडे नसेल त्यांच्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने 'डेब्रिज ऑन कॉल (Debris on Call)' सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोबाईल क्र. 8591256150 यावर संपर्क साधून विहित रक्कम भरणा केल्यानंतर आपल्या डेब्रिजची सुयोग्य रितीने विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणेची मदत घेऊ शकतात.*
*मात्र जे नागरिक अथवा बांधकाम व्यावसायिक महानगरपालिकेच्या सी अँड डी प्रकल्पाव्यतिरिक्त इतर ठिकाणी बांधकाम व पाडकाम कचरा (C & D Waste) अर्थात डेब्रिज टाकून शहर स्वच्छतेला बाधा आणत असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे सूचित करण्यात येत आहे.*