रत्नागिरी दिनांक 27 : मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोहोचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी, कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, विश्वस्त प्रमुख कोमसाप रमेश कीर, कोमसापचे अरुण नेरुरकर, अध्यक्षा कोमसाप तथा सदस्य भाषा विकास समिती रत्नागिरी नमिता कीर, कवी केशवसुत स्मारक मालगुंड चे अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य साधना साळवी, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, उपसभापती पंचायत समिती रत्नागिरी उत्तम सावंत, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सामंत म्हणाले मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी, ती जगाच्या पाठीवर पोचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
ते म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या बाबत मुख्यमंत्री महोदयांनी देखील माननीय पंतप्रधान महोदय यांची भेट घेतली असून ते त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी आपण सर्वांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचनाचे महत्व या विषयावर आपले विचार मांडणा-या आलिया या मुलीचे त्यांनी कौतुक केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
खासदार विनायक राऊत आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की शासन स्तरावर मराठी भाषा समृद्ध, सुदृढ होण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते करण्यात येत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर म्हणाल्या की मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. वाचन, लेखन संस्कृती वाढविणे आवश्यक आहे.
कवी केशवसुत स्मारक मालगुंड चे अध्यक्ष गजानन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.