मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचा वारसा जपा- प्राचार्या इंदुमती घरत; सीकेटी विद्यालय व कोमसापतर्फे मराठी भाषा दिन साजरा

मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचा वारसा जपा- प्राचार्या इंदुमती घरत; सीकेटी विद्यालय व कोमसापतर्फे मराठी भाषा दिन साजरा 



पनवेल(प्रतिनिधी)  मराठी भाषा गोड आहे, तिची भुरळ अनेक अमराठी माणसांनाही पडली आहे त्यामुळे आपल्या मातृभाषेचा वारसा आपण जपला पाहिजे असे मत चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या इंदुमती घरत यांनी आज नवीन पनवेल येथे सोहळ्यात व्यक्त केले.
           चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
         मराठी भाषा दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या या सोहळ्याचे उद्घाटन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज यांची प्रतिमा आणि त्यांच्या पुस्तकांचे पालखीत पूजन केल्यानंतर शाळेच्या मुख्य द्वारापासून पालखी काढण्यात आली.
          या पालखी बरोबर शाळेच्या विद्यार्थी - विद्यार्थिनी पारंपारिक वेष परिधान केले होते.कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे पदाधिकारी व विद्यालयाचे शिक्षक यांनी पेटे घातल्याने कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप आले होते.
        कोमसाप नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी आपल्या भाषणात, प्रत्येकाला मातृभाषेचा अभिमान आहे. ही मातृभाषा लोप पाऊ नये म्हणून तिचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे,याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून केली तर तिचा विस्तार होईल. देशातील अनेक राज्यांमध्ये त्यांच्या असणाऱ्या मातृभाषेला मोठ्या प्रमाणात महत्त्व  आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही मराठी भाषेला महत्त्व दिले गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
        या मराठी भाषा दिनाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर ,संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत ,उपाध्यक्ष वाय.टी. देशमुख आणि संस्थेचे सचिव डॉ. एस.टी गडदे यांनी शुभेच्छा दिल्या.
         या कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ज्येष्ठ गझलकारा ज्योत्स्ना राजपूत,सुनिता रामचंद्र, स्मिता गांधी, रामदास गायधने,गणेश म्हात्रे,योगिनी वैदू,रमेश भोळे,सुमंत नलावडे चित्रलेखा जाधव,विलास पुंडले, अनिल दाभाडे तसेच चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण,सिकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे,पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका संध्या अय्यर, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे,अजित सोनवणे प्रशांत मोरे,अनुराधा कोल्हे उपस्थित होते.
      यावेळी विज्ञान रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच ज्युनियर कॉलेजच्या भित्तीपत्रिकचे उद्घाटन आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनावरील हस्तलिखित पुस्तिकेचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील,सारीका दिवेकर,सुवर्णा शिर्के यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषा दिनानिमित्त श्रावणी हजारे हिने  गीत गायले तसेच वेदांत शिंदे याने भाषण केले