जेएसडब्ल्युकडून होणाऱ्या रोजगार निर्मीतीचा फायदा घ्या- राजा केणी*शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख
सचिन पाटील(पोयनाड,अलिबाग)-डोलवी येथील जेएसडब्ल्यु कंपनीमुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्याचबरोबर कंपनीकडून सामाजिक दायित्व फंडातून आसपासच्या गावांना पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य अशा पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जातो. याचा फायदा अलिबाग, पेण, पाली, रोहा तालुक्यातील अनेक गावांनी घेतला आहे. यापुढे कंपनीचे विस्तारिकरण होत असल्याने हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा घेण्याचे आवाहन शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी केले आहे.
काही दिवसात जेएसडब्ल्यु कंपनीचा विस्तारीत प्रकल्प पुर्णत्वास येणार आहे. यामध्ये हजारो स्थानिक तरुणांना कंपनीत नोकऱ्या मिळणार आहेत. त्याचा फायदा येथील आर्थव्यवस्थेसही होणार आहे. यापुर्वीही कंपनीने सामाजिक दायित्व निभावत येथील तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या आहेत. कंपनीतील थेट नोकरीबरोबरच अप्रत्यक्षपणेही या कंपनीमुळे रोजगार मिळाला आहे. कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार याच परिसरात राहत असल्याने वाहतुक, निवास व्यवस्था, आरोग्य, अन्नधान्य यातून करोडो रुपयांची उलाढाल कामगारांच्या पैशातून होत आहे. मागील वीस वर्षाचे सातत्य असलेल्या या स्टील कंपनीत आतापर्यंत हजारो तरुणांना रोजगार मिळवून आपले संसार सुखाने थाटले आहेत. कोरोना कालावधीत जेएसडब्ल्यु कंपनीने रायगड जिल्ह्यालाच नाही तर देशातील रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्याचे काम केले आहे. देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा होता तेव्हा या कंपनीतून दर दिवसाला 15 ते 20 ऑक्सिजनचे टॅंकर देशभरात जात होते. त्याचबरोबर जेएसडब्ल्यु कंपनीने कोव्हीड रुग्णालये सुरु करुन रायगड मधिल रुग्णांना दिलासा दिलेला आहे. कंपनीकडून अलिबाग, पेण, रोहा या तालुक्यातील गावांना शैक्षणिक सुविधांसाठी आर्थिक मदत केली आहे. शाळांसाठी संगणक, रंगरंगोटी करणे, दुरुस्ती करणे यासाठी कंपनीकडून सातत्याने मदत केली जात आहे. हेच सातत्य कंपनीच्या विस्तारिकरणानंतर वाढणार आहे, असे कंपनी प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे कंपनीतून निर्माण होणाऱ्या रोजगार संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी जिल्हातील तरुणांना केले आहे.