प्रशासनाने किल्ले सुधागड येथे स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती केली साजरी

                                                         

प्रशासनाने किल्ले सुधागड येथे स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती केली साजरी

     *अलिबाग,दि.21(जिमाका):-* महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार किल्ले सुधागड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुधागड किल्ल्यावरील स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. सुरुवातीला किल्ले सुधागड च्या पायथ्याशी दर्यागाव ठाकरवाडी येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी स्थानिक सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते, सोबत उपसचिव डॉ.नामदेव भोसले, प्रांताधिकारी डॉ.यशवंतराव माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार दिलीप रायण्णावार, रायगड जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी श्री.कोळपे, गट विकास अधिकारी सुधागड विजय यादव, कृषी अधिकारी अशोक महामुनी तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आलेले अभियंते व सुधागड मधील सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

     त्यानंतर किल्ले सुधागड वर चढाई करण्यात आली. तेथे "बा रायगड"चे जवळजवळ 300 सदस्य उपस्थित होते. प्रथम शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, पुरातत्त्व विभाग, बा रायगड व स्थानिक प्रशासन असे मिळून सुधागडची साफसफाई करण्यात आली.

     दि.21 फेब्रुवारी रोजी एन.एस.एस.चे विद्यार्थी व बा रायगडचे सदस्य संपूर्ण सुधागड किल्ला पुन्हा एकदा साफसफाई करणार आहेत. किल्ल्यावरील साठलेला सर्व प्लास्टिकयुक्त कचरा हा ग्रामपंचायत सिद्धेश्वर यांच्या माध्यमातून पुर्नवापरासाठी प्रोसेसिंग युनिटकडे पाठविण्यात येणार आहे.