पनवेल(प्रतिनिधी)-तळोजा औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून तळोजे जवळील परिसरातील तालुक्यातील पाले बुद्रुक, कोळवाडी, पडघे, वळवली, वलप, फणसवाडी आणि सागवाडी येथील जमिनींवर एअर फोर्सचा प्रकल्प आणण्याचे काम सुरु असून याठिकाणी होणाऱ्या सर्व्हेबाबत ग्रामस्थांची एकदिशा ठरविली जावी यासाठी येथील विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह ग्रामस्थांच्या पंचकृषी शेतकरी वर्गाची बैठक सोमवारी सायंकाळी कोळवाडी येथील संजय गांधी स्मारक विद्यालयामध्ये पार पडली.
या बैठकीमध्ये पडघे गावचे सुपुत्र, शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, वलप गावाचे सुपुत्र, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, पाले बुद्रुक गावाचे सुपुत्र तथा काँग्रेस पक्षाचे पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, भाऊशेठ भोईर, पांडुशेठ भोईर, प्रकाश म्हात्रे, हिरशेठ तांडेल, पाठेमामा, सुरेश भोईर, ज्ञानेश्वर भोपी, अर्जुन म्हात्रे, प्रमोद ठक्कर आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती. यावेळी बैठकीदरम्यान प्रभाकर भोईर यांनी शासनाच्या ड्रोन सर्व्हेला विरोध दर्शवित याबाबत पुढचे पाऊल उचलणे गरजेचे असल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या मागणीवर ग्रामस्थांनी एकमत दर्शविले, तसेच शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांनी याबाबत कॅबिनेट बैठक लावून ग्रामस्थांच्या अडचणी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना समक्ष बोलावून सोडविल्या जातील यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मत व्यक्त केले.