सुधागड (पाली) येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकामासाठी 12 कोटी 50 लक्ष रकमेस शासनाची प्रशासकीय मान्यता प्रदान-पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित
*अलिबाग,दि.16 (जिमाका):-* सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांनी सुधागड येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे यांना प्रशासकीय मान्यता मिळण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिश: या प्रस्तावाचा पाठपुरावा केला. त्यानुषंगाने आता शासनाने हे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह उभारण्यासाठी 12 कोटी 50 लक्ष रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचेच हे फलित आहे.
या कामाची सुरुवात सन 2021-22 या आर्थिक वर्षापासूनच होणार असून याकरिता या आर्थिक वर्षात (सन 2021-22) रु.1 कोटी 25 लक्ष, पुढील आर्थिक वर्षात (सन 2022-23) रु.5 कोटी 25 लक्ष तर त्यापुढील आर्थिक वर्षात (सन 2023-24) रु.6 कोटी खर्च अपेक्षित आहे.
पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून आदिवासी मुलांसाठी या शासकीय वसतिगृह इमारतीच्या बांधकामाची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करण्यात येईल, असे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.