सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन संपन्न-
विरोधी पक्षनेते श्री. प्रितम म्हात्रे यांची स्नेहसंमेलनाला भेट
पनवेल दि. २३ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामधे संपन्न झाले. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प.म.पा. विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू, संघाचे माजी अध्यक्ष बळिराम परब, रामकृष्ण परब, सतीश हिन्दळेकर, माजी सचीव कालिदास कावले, यांच्यासह विद्यमान अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रीता भोजने, सचीव रामचंद्र मोचेमाडकर, श्री आनंद धुरी, श्री मंगेश अपराज आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले.
या वेळी मनोगत व्यक्त करताना श्री.प्रितम म्हात्रे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व उपक्रमांची प्रशंसा केली व आपल्या जे. एम्. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून संस्थेला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीना मान्यवरांच्या हस्ते सिंधुरत्न आणि जीवनगौरव पुरस्कारांनी यावेळी सन्मानित करण्यात आले. रायगड तसेच चिपळूण परिसरात पूरग्रस्ताना संघाच्या वतीने करण्यात आलेल्या मदतीला विशेष सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व सोसायटींचा सन्मान करण्यात आला. तसेच समाजोपयोगी कार्य करणाऱ्या प्रिया खोबरेकर आणि सोनिया मोचेमाडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
संघाचे सभासद व पाल्यांच्या कलागुणाना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये सहभागी कलाकारानी गायन, वादन, करावके, नृत्य आदी कलाप्रकार सादर करून उपस्थितांची प्रशंसा प्राप्त केली. यामधे "स्वीट फिफ्टिज" या ज्येष्ठ महिलांच्या समूहाने केलेले नृत्य कार्यक्रमाचा आकर्षणबिंदू ठरला. वैभवी मराळ यांनी या कार्यक्रमात अभ्यासपूर्ण निवेदन केले. संस्थेची कार्यकारिणी, सभासद व युवा वर्गाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.