नवी मुंबई महानगरपालिका- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकसहभागातून जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

 नवी मुंबई महानगरपालिका-

 राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकसहभागातून जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

 


      25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून हा दिवस संपूर्ण देशभरात 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढवा म्हणून जनजागृतीसाठी करणे अपेक्षित असून यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

      राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून लोकसहभागाला महत्व देत घोषवाक्य, लघुपट, जिंगल, मीम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सध्याच्या कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने स्पर्धकांनी या स्पर्धेतील सहभागाकरिता आपल्या प्रवेशिका electionnmmc@gmail.com या ई मेल पत्त्यावर दाखल करावयाच्या आहेत. 23 जानेवारी 2022 रोजी 12.. वा.पर्यंत प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम वेळ असून याविषयीच्या अधिक माहितीसाठी 9152099255 / 9152199255 या क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.

      'लघुपट (Shortfilm) स्पर्धे'करिता - गोष्ट लोकशाहीची, मताधिकार हा माझा कायदेशीर अधिकार, सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचे महत्वदिव्यांगांच्या मताधिकाराचे महत्व, तृतीय पंथीयांच्या मताधिकाराचे महत्व आणि आवाहन हे पाच विषय असून लघुपट नामावलीसहित 1 ते 5 मिनिटे वेळेचे असावेत असे नमूद करण्यात आलेले आहे. कोणतेही स्पर्धक कोणत्याही एका अथवा पाचही विषयांवर लघुपट सादर करू शकतात. सर्वोत्कृष्ट लघुपटांना रू. 25 हजार, रू. 15 हजार व रू. 10 हजार अशी पारितोषिके असून वैयक्तिक पारितोषिकेही प्रशस्तिपत्र व स्मृतीचिन्ह स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहेत.

      'जिंगल स्पर्धे'करिता - लोकशाही शासन पध्दतीने फायदे, 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणीचे आवाहन, सक्षम लोकशाहीचे मताधिकाराचे महत्व - असे 3 विषय असून जिंगल मराठी भाषेत 1 ते 3 मिनिटे वेळेची असावी असे जाहीर करण्यात आलेले आहे. कोणतेही स्पर्धक कोणत्याही एका अथवा तिन्ही विषयांवर जिंगल सादर करू शकतात. सर्वोत्कृष्ट जिंगल्सना रू. 10 हजार, रू. 7 हजार व रू. 5 हजार अशी पारितोषिके असून वैयक्तिक पारितोषिकेही प्रशस्तिपत्र व स्मृतीचिन्ह स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहेत.

     अशाचप्रकारे 'मीम स्पर्धा'ही आयोजित करण्यात आली असून त्याकरिता - निवडणुकीच्या दिवशी फिरायला जाणारे लोक, सगळी व्यवस्था भ्रष्ट आहे असे समजून मताधिकार न बजावणारे लोक, मतदार नोंदणी न करणारे लोक, 18 वर्षाची जबाबदारी -  मतदार नोंदणी, माझ्या महाविद्यालयातील 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवांनी मतदार नोंदणी करावी म्हणून... असे 5 विषय देण्यात आलेले आहेत. कोणतेही स्पर्धक कोणत्याही एका अथवा पाचही विषयांवर मीम सादर करू शकतात. यामधील प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्यांना रू. 7 हजार, रू. 5 हजार व रू. 3 हजार रक्कमेची पारितोषिके जाहीर करण्यात आलेली आहेत.

याशिवाय 'घोषवाक्य' स्पर्धा जाहीर करण्यात आली असून स्पर्धक यामध्ये सहभागाकरिता - सर्वोत्कृष्ट शासनपध्दती - लोकशाही, 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणीचे आवाहन, मताधिकाराचे महत्व - अशा 3 विषयांवरील घोषवाक्ये पाठवू शकतात. कोणतेही स्पर्धक कोणत्याही एका अथवा तिन्ही विषयांवर घोषवाक्य  सादर करू शकतात. यामधील प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्यांना रू. 3500/-, रू. 2500/-, रू. 1500/- पारितोषिकांनी सन्मानीत करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांनी आपल्या कलाकृती या लोकशाही समृध्द करण्यासाठी व मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी असतील याची दक्षता घेण्याचे सूचित करीत यामधील कोणत्याही बाबीमुळे नागरिक अथवा समुह यांच्या कोणत्याही प्रकारच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे.

तरी नवी मुंबईतील कल्पक नागरिकांनी आपल्यामधील प्रतिभेला संधी देणा-या या अभिनव स्पर्धांमध्ये सहभागी होऊन लोकशाही मूल्य सक्षमतेने रूजविण्यासाठी आपल्या कलाकृती सादर कराव्यात आणि याविषयीच्या जनजागृतीला हातभार लावावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image