साप्ताहिक सत्यशोधक वृत्तपत्राचे कार्य ऐतिहासिक ठेवा-उत्तम कांबळे
रत्नागिरी दि.6 : सत्यशोधक साप्ताहिकाची 150 वर्षाची वैभवशाली परंपरा जपण्याचे काम नव्या पिढीने केले आहे. असत्याला सत्य मानून खोट्याचे खरे करण्याचा आजच्या काळात सत्यशोधक साप्ताहिकाने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श ठेवला आहे असे प्रतिपादन सकाळचे माजी संपादक आणि विचारवंत उत्तम कांबळे यांनी केले.
आज अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे सात्पाहिक सत्यशोधक या वृत्तपत्राच्या 150 व्या वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार ,जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळ्ये, साप्ताहिक सत्यशोधक चे संपादक नितीन लिमये, सत्यशोधक विशेषांकाचे अतिथी संपादक धीरज वाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झालेले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले की, आजचा दिवस मराठी पत्र सृष्टीसाठी मोलाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन निर्माण करून पत्रकारांसाठी हक्काची जागा प्राप्त झाली आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी येथेही अद्ययावत पत्रकार भवन उभे केले जाईल. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोकणातील पत्रकार विकासासाठी नेहमी सहकार्य करीत असतात. शासन कोकण विकासासाठी कटिबद्ध आहे. रत्नागिरी जिल्हयात अनेक विकास कामे सुरु आहेत. आजच्या ऐतिहासिक दिनी साप्ताहिक सत्यशोधक 150 वर्ष पूर्ण करीत आहे हे कोकणवासीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. मी पत्रकारांना शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले.
श्री उत्तम कांबळे म्हणाले की, कोकणाने देशाला मार्गदर्शक ठरतील असे अनेक महत्त्वाचे नेते,विचारवंत दिले आहेत. महात्मा फुलेंचा सत्यधर्म केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर नेण्याचे काम कोकणातील जनतेने केले आहे. नव्या युगात वृत्तपत्र चालविणे खूप कठीण बाब आहे. वाचकांचे पाठबळ यासाठी खूप महत्त्वाचे असते. सत्यशोधक साप्ताहिकाने आजचा विशेषांक प्रकाशित करुन नव्या पिढीसाठी एक संदर्भग्रंथ उपलब्ध करून दिला आहे. जगात दीडशे वर्षापूर्वी वृत्तपत्र काढणे हे खूप कठीण काम होते. त्याकाळात सत्य शोधण्यासाठी सत्यशोधक ची निर्मिती झाली आहे असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.बी .एन. पाटील आणि कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांचे समयोचिक भाषण यावेळी झाले.
माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले की, कोकणासाठी शाश्वत विकासाची गरज आहे. कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कोकणातल्या नैसर्गिक साधनसामुग्री वर आधारित प्रकल्प उभे राहिल्यास स्थानिक जनतेला रोजगार उपलब्ध होऊ शकेल. कोकणाला लाभलेला समृद्ध सागरी किनारा आणि त्याची खोली यातून कोकण अधिक श्रीमंत होऊ शकतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिक सत्यशोधक च्या विशेषांकाचे अतिथी संपादक धीरज वाटेकर यांनी केले.या कार्यक्रमाचे आभार साप्ताहिक सत्यशोधक चे संपादक नितीन लिमये यांनी मानले.सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल बर्वे यांनी केले.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करून झाले.