पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सीताताई पाटील तर स्थायी समिती सभापतीपदी नरेश ठाकूर यांची निवड-खारघरमधून एकाचवेळी तीघांना सभापतीपदाची संधी

पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सीताताई पाटील तर स्थायी समिती सभापतीपदी नरेश ठाकूर यांची निवड-खारघरमधून एकाचवेळी तीघांना सभापतीपदाची संधी


पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सीताताई पाटील यांची तर स्थायी समिती सभापतीपदी अ‍ॅड नरेश ठाकूर यांची निवड झाली असून महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांची निवड झाली आहे. पनवेल महापालिकेच्या उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती आणि प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक झाली. उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या, तसेच स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती आणि प्रभाग समिती सभापती पदांच्या जागांसाठी सोमवारी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.

      या निवडणुकीत उपमहापौरपदासाठी भाजपकडून नगरसेविका सीताताई पाटील, स्थायी समिती सभापतीपदासाठी नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी नगरसेविका सौ. हर्षदा उपाध्याय, तसेच प्रभाग समिती ‘अ’सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.संजना समीर कदम, ‘ब’साठी नगरसेविका प्रमिला पाटील,प्रभाग समिती ‘क’सभापतीपदासाठी नगरसेविका अरुणा भगत, तर प्रभाग समिती ‘ड’सभापतीपदासाठी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असल्यामुळे या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.