पनवेलमध्ये राबवले महाराजस्व अभियान, पनवेल तहसील कार्यालयाचा उपक्रम
पनवेल : पनवेल तालुक्यातील पिसार्वे, वाजे, ओवळे, साई, नेरे, पोयंजे, पळस्पे गावात तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते महाराजस्व अभियान राबवण्यात आले. सर्वसामान्य जनता आणि शेतकरयांचे महसूल विभागांतर्गत दैनंदिन प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सन २०१५ पासून राज्यात महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.
सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांशी नियमित संबंध येतो. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरीत निकाली काढण्याच्या अनुषंगाने राज्यात “महाराजस्व अभियान” दरवर्षी १ ऑगस्ट ते ३१ जुलै या कालावधीत राबविले जाते. “महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक” करण्याच्या अनुषंगाने यावर्षीही “महाराजस्व अभियान” राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय ११ नोव्हेंबर २०२१ निर्गमित झाला आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील २३ नोव्हेंबर २०२१ रोजीचे पत्रान्वये महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्रत्येक तालुक्यात मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेवून एका महिन्यापेक्षा अधिक काळ प्रलंबीत असणारे फेरफार निर्गत करण्यात यावेत, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पनवेल तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत आयोजीत करून त्याबाबत व्यापक प्रसिध्दी करून पनवेल तालुक्यातील मंडळामध्ये फेरफार अदालतींचे आयोजन करण्यात आले आणि फेरफार अदालतीमध्ये एकुण १३१ प्रलंबती फेरफार निर्गत करण्यात आले. प्रामुख्याने शिवार फेरी, फेरफार अदालत, अनधिकृत अकृषिक प्रकरणे शोधणे, अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा करणे, अतिक्रमित शीव रस्ते, पाणंद रस्ते मोकळे करणे व इतर बाबींचा समावेश असून जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे घटक राबविण्यात येणार आहेत. महास्वराज्य अभियान अंतर्गत या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्यात पनवेल तहसील कार्यालयाकडून आयोजन करण्यात येत आहे.
" महसूल विभागात महसुली कामा व्यतिरिक्त इतरही कामे केली जातात. त्या विभागाची जबाबदारी महसूल कार्यालयावर असल्याने कामामध्ये कमी वेळ मिळाल्याने सातबाऱ्याच्या नोंदणीची कामे प्रलंबित राहतात. शासनाने ठरवून दिलेल्या आठवड्यातील ठराविक वारी हा उपक्रम राबविल्याने लोकांचा वेळ आणि श्रम निश्चितच वाचत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे प्रमाणे महाराजस्व अभियान आठवड्यातील दर बुधवारी राबवण्यात येणार असून याचा शेतकऱ्यांना निश्चितच लाभ मिळणार आहे.-विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल