चिपळूणच्या पूरस्थितीची पुनरुक्ती होवू नये यासाठी कामकाज सुरु
*गाळाचा उपसा करुन प्रवाह मोकळा करणार*
रत्नागिरी दि.04:- चिपळूण शहरात जुलैमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीची पुनरुक्ती होवू नये यासाठी नदीतील गाळ काढणे तसेच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरलेली बेटे हटविणे याबाबत निर्णय प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
नदीत इतक्या वर्षात 67 लाख घनमीटर इतका गाळ जमा झाला आहे. तो सर्व गाळ उपसून काढण्याचे काम पाटबंधारे विभागाने करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. यासाठीचे काम उपलब्ध निधीतून सध्या सुरु झाले आहे मात्र अधिक निधी लागणार असल्याने त्याबाबत प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीस पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज.म.पाटील आदींची उपस्थिती होती.
नदीत गाळ साठण्यासोबतच नदी समुद्रास मिळते त्याठिकाणी नदीच्या प्रवाहात बेटांची निर्मिती झाली आहे. त्याचा प्रवाहाला अडथळा होत आहे तसेच नदीपात्रात वापर नसलेल्या दोन पुलांमुळे देखील पाणी अडते असे दिसून आले आहे. या सर्व कारणांचा शोध घेतल्यावर आता उपाययोजना सुरु झाली आहे.
नदीपात्रातील गाळ काढून तो काही सखल असणाऱ्या भागात टाकला जात आहे. या नगरपालिकेने जागांची यादी तयार केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून याला सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी हा नदीतला गाळा खूप लाभदायक आहे त्यामुळे स्वत: वाहून नेण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांना हा गाळ देण्याचे धोरण ठरविण्यात आले.
नदीपात्रात बिनकामी असलेल्या पुलांना हटविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
नदी अंतर्गत वाहतूक शक्य व्हावी यासाठी तयार झालेली बेटे काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व वाशिष्टी नदीमधील आहेत.
यासोबतच वैतरणी आणि वाशिष्ठीत गाळ काढल्याने नदीपात्र खोल होवून नदीचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता कमी होईल. प्राथमिकता नदीप्रवाह सुरळीत करण्यासाठी द्यावी असे जिल्हाधिकारी म्हणाले.
---