खारघर मधील गोखले शाळेच्या वर्गखोल्यांची दुरावस्था;प्रशासन लक्ष देणार का ?-भाजपा खारघर मंडल सरचिटणीस दिपक शिंदे
खारघर(प्रतिनिधी)- मागील दीड दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद होत्या. यादरम्यान मा.जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार तळोजा कारागृहातील अतिरिक्त कैद्यांसाठी वेगळे विलगीकरण केंद्र खारघरमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोखले शाळेत करण्यात आले. दीड वर्ष त्यांनी शाळेच्या वर्गाचा वापर केला. या सर्व वापरलेल्या खोल्यांमध्ये खिळे ठोकले गेले, वर्गखोल्यांचे रंग उडाले, स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली. ही बाब पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांना कळविण्यात आली होती. त्यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर या शाळेला तुरुंग अधीक्षक तळोजे, तहसीलदार पनवेल,पीडब्ल्यूडी यांनी संयुक्तिक भेट दिली होती. त्यांनी वर्गखोल्यांचे सर्वेक्षण केले; परंतु यावर पुढे काहीही प्रगती झालेली नाही. सर्व वर्गखोल्या आहे तश्याच अवस्थेत आहेत.
काल गुरुवार दिनांक १६ डिसेंबर पासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू झाले. अशा दुरावस्था झालेल्या वर्गात मुलांना शिकावे लागणार आहे. शाळेतील शिक्षकांनी व पालकांनी यावर नाराजी व्यक्त केलेली आहे.यासंदर्भात संबंधित अधिकारी, पनवेल महानगरपालिका आयुक्त, महापौर, सभागृह नेते यांना भारतीय जनता पार्टी, खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी मेलद्वारे निवेदन दीले आहे आणि प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की,आतातरी शाळेची डागडुजी करणार का ?