"प्लॉग रन"व्दारे वाशीत स्वच्छता आणि आरोग्य जपणूकीच्या संदेशाचे प्रसारण


 "प्लॉग रन"व्दारे वाशीत स्वच्छता आणि आरोग्य जपणूकीच्या संदेशाचे प्रसारण

 




      *'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला सामोरे जाताना 'स्वच्छ भारत मिशन' ने घोषित केल्याप्रमाणे 'नागरिकांना प्राधान्य (People First)' दिले जात असून 'माझं शहर - माझा सहभाग' या घोषवाक्याच्या अनुषंगाने लोकसहभागावर भर दिला जात आहे. अशाच प्रकारचा 'प्लॉग रन' सारखा एक अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत ठिकठिकाणी राबविला जात असून वाशी सेक्टर 3 व 9 येथील प्लॉग रनमध्ये 200 हून अधिक नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.*

      धावता धावता रस्त्यातील प्लास्टिक कचरा गोळा करून तो योग्य जागी संकलीत करण्याची 'प्लॉग रन'ची संकल्पना आरोग्य जपता जपता शहर स्वच्छतेला हातभार लावणारी आहे. याव्दारे सामाजिक बांधिलकी जपली जात असून यामध्ये नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी होत असल्याचे वाशीतील प्लॉग रनमध्ये दिसून आले.

      प्लॉग रन करताना रस्त्यातील प्लास्टिक कचरा उचलण्यासाठी वाकणे, बसणे अशा क्रियांमुळे स्नायुंना आपोआप ताण मिळून व्यायाम होतो व याची मदत उपयोग शरीर निरोगी राहण्यास होते. याशिवाय धावण्यासारख्या व्यायामाच्या माध्यमातून स्वत:चे आरोग्य जपताना आपण शहर स्वच्छतेची जबाबदारीही पार पाडतो आहोत याचे मानसिक समाधानही लाभते. याव्दारे स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी साध्य होत असल्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

      *वाशी सेक्टर 3 व 9 मध्ये राबविण्यात आलेल्या प्लॉग रन मध्ये एलसीएफ फाऊडेशन तसेच खाकी ॲकॅडेमी अर्थात पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र यांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. याप्रसंगी प्लास्टिक बंदी बाबत सामुहिक शपथ घेण्यात आली. तसेच प्लॉग रन अंतर्गत 1 किमी दौड करून 210 किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला.*

      *यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विभागात प्लॉग रनचे आयोजन करण्यात येत असून प्रत्येक आठवड्याला 'प्लॉग रन' मार्फत स्वच्छता आणि आरोग्य जपणूकीचा संदेश नवी मुंबईत लोकसहभागातून प्रसारित होणार आहे.*

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image