कामोठेचा पाणी प्रश्न पालिका सभागृहात, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे वेधले सभागृहाचे लक्ष
पनवेल : कामोठे वसाहतीमध्ये भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सोमवारी (ता. २०) आयोजित महासभेत केला आहे. वसाहतीमधील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी देण्यासाठी पालिकेतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवण्यात यावे, अशी मागणी या वेळी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
पनवेल महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी कामोठे वसाहतीत सिडकोद्वारे होणारा पाणीपुरवठा अत्यंत दूषित व जंतूयुक्त असल्याचे सभागृहात सांगितले. वसाहतीतील तीन कुटुंबातील लहान मुले आजारी पडल्याचे यावेळी त्यांनी सभागृहात मांडले. कामोठे येथे होणाऱ्या दूषित पाणीपुरवठामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सांगत सदर विषयावर तात्काळ कार्यवाही करून पाणी प्रश्न सोडवावा व तातडीने कामोठे वसाहतीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी सभागृहापुढे केली. कामोठे वसाहतीमधील अनेक भागांत काही दिवसांत दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. सिडकोद्वारे वसाहतीला केल्या जात असलेल्या पाणी पुरवठ्यात जंतू आढळून येत असल्याने नागरिकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सभागृहाचे लक्ष कामोठेमधील पाणीप्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला. सिडको तसेच पालिकेच्या माध्यमातून वसाहतीमधील रहिवासी संस्थांना स्वच्छ पाणी पुरवण्यात यावा, अशी मागणी या वेळी केली.
स्वच्छ पाण्यासाठी पालिका प्रयत्नशील
विरोधी पक्षनेते पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या विषयावर बोलताना पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी वसाहतीला स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी जलवाहिन्या दुरुस्ती करून सिडकोकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. गरज भासल्यास पालिकेद्वारे वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहाला दिले आहे.