बदलते हवामान व अवकाळी पावसापासून संरक्षणासाठी कांदा पिकाच्या व्यवस्थापनाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन केले जाहीर
*अलिबाग,जि.रायगड,दि.07 (जिमाका):-* बदलते हवामान व वेळोवेळी येणारा अवकाळी पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी कांदा पिकाच्या व्यवस्थापनाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी रोहा कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी तज्ञांमार्फत मार्गदर्शनपर माहिती शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे दिली आहे-
लागवड केलेली कांदा रोपे व रोपवाटिकेच्या वाफ्यातील पाणी चराद्वारे काढून पाण्याचा निचरा करणे, नवीन कांद्याची लागवड ही गादी वाफा किंवा सरी वरंब्यावर करावी, लागवड करतेवेळी सेंद्रीय खत शेणखत/गांडूळखत यापैकी एक प्रति चौरस मिटरला 1 किलो ट्रायकोडर्मा पावडर 10 ग्रॅम किंवा निंबोळी पावडर प्रति चौरस मिटरला 50 ग्रॅम याप्रमाणे मातीत मिसळून गादी वाफे किंवा सरी वरंबा तयार करावे, रोपांची पुर्नलागवड करतेवेळी रोपाची मुळे ट्रायकोडर्मा पावडर 25 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कार्बनडेन्झिम 2 ग्रॅम इमिडाक्लोरोपीड 1 मिलिलीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 5 मिलिलीटर प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून रोपाची मुळे 10 ते 15 मिनिटे रोपे बुडवून नंतर रोपाची लागवड करावी, लागवडीनंतर 10 दिवसांनी ॲझॉक्सिस्ट्रोबीन 11% + टेब्यूकोनाझोल 18.3% (टोझीक/ॲमिस्टार) 10 मिलिलीटर + क्विनॉल फॉस 15 मिलिलीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 15 मिलिलीटर याप्रमाणे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, लागवडीनंतर 15 दिवसांनी ॲझॉक्सिस्ट्रोबीन 11% + टेब्यूकोनाझोल 18 3% (टोझिक/ॲमिस्टार) 10 मिलिलीटर + क्विनॉल फॉस 15 मिलिलीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 15 मिलिलीटर याप्रमाणे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, लागवड केलेल्या कांदयाच्या रोपाची मर होत असेल तर सिलीकॉन + स्टीकर किंवा सूक्ष्म अन्नघटक म्हणून चिलेटेड झिंक 2 ग्रॅम / 2 मिलिलीटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, कांदा रोपाची मर होत असेल तर मेटालेक्सिल 8% + मेन्कोजेब 64% (बुलेट) रेडोमिलगोल्ड) किंवा हेक्झाकोनाझोल (कोन्टोप) 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ड्रिचींग करणे (वाफयात सोडणे).
तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा उपयोग करून बदलते हवामान व वेळोवेळी येणारा अवकाळी पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी कांदा पिकाच्या व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.