नवी मुंबई महानगरपालिका-नागरिकांच्या सुविधेकरिता दिवाळीतही सुरू आहेत महापालिका रूग्णालयातील लसीकरण केंद्रे
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड लसीकरणाला वेग देण्याकरिता नागरिकांना सुविधाजनक होईल अशाप्रकारे विविध विभागांतील लसीकरण केंद्र संख्येत वाढ करण्यात आलेली असून पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे. अशाच प्रकारे नागरिकांनी दुसरा डोसही विहित वेळेत घेऊन संपूर्ण लस संरक्षित व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात आलेले असून स्थानिक पातळीवर नागरी आरोग्य केंद्र तसेच महानगरपालिकेच्या कॉल सेंटरव्दारेही नागरिकांशी संपर्क साधून दुसरा डोस योग्य कालावधीत घेण्याबाबत अवगत करण्यात येत आहे.
सध्या दिवाळीचा उत्सवी सुट्टीचा कालावधी असला तरी नागरिकांची लसीकरणाबाबत अडचण होऊ नये यादृष्टीने महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली व तुर्भे रूग्णालयांमधील लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. ज्या नागरिकांनी कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेला असेल त्यांनी 84 दिवसानंतर कोव्हीशील्ड लसीचा दुसरा डोस घ्यावा तसेच ज्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांनी 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावयाचा आहे. महानगरपालिकेच्या चारही रूग्णालयांमध्ये सकाळी 9 ते सायं. 5 वा. पर्यंत विनामूल्य लसीकरण उपलब्ध आहे.
एखाद्या व्यक्तीने खाजगी रूग्णालय अथवा कँम्पमध्ये किंवा इतर शहरांत लसीचा पहिला डोस घेतला असेल तरी त्याच लसीचा दुसरा डोस नवी मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर घेता येईल याची नोंद घ्यावयाची आहे.
आत्तापर्यंत 11 लाख 27 हजार 272 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 6 लाख 21 हजार 950 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. म्हणजेच 56 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला असून सर्व नागरिकांनी विहित वेळेत दुसरा डोस घ्यावा याकरिता महानगरपालिका विविध माध्यमांतून प्रयत्नशील आहे.
कोव्हीडपासून संपूर्ण संरक्षणासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असून ज्या नागरिकांचा दुसरा डोस घ्यायचा विहित कालावधी असेल त्यांनी तो त्वरित घ्यावा असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीडचे एक अथवा दोन्ही डोस घेतले असले तरी मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे या कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे कोव्हीडच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी गरजेचे असल्याचे सूचित केले आहे.