जिल्ह्यातून जास्तीत जास्त राष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे- पालकमंत्री कु. आदिती तटकरे
अलिबाग, जि.रायगड, दि. 14 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात अनेक प्रतिभावंत राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्याची क्षमता आहे, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड आणि तालुका क्रीडा संकुल समिती, रोहा, जिल्हा रायगड च्या वतीने तालुका क्रीडा संकुल रोहा येथील बॅडमिंटन हॉल चे नूतनीकरण करून त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त राष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी सहभागी होऊन प्रावीण्य प्राप्त करून टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे नमूद केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी सचिन निकम यांनी मानले.
यावेळी विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे, रोहा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष श्री.मधुकर पाटील, श्री.विनोद पाशिलकर, श्री.विजयराव मोरे, धाटाव ग्रामपंचायत सरपंच श्रीमती सुवर्णा रटाटे, श्री.यशवंत रटाटे, जयवंत मुंडे, संतोष भोईर, महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय एकलव्य पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू संदीप गुरव, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू सिद्धेश शिर्के, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, क्रीडा अधिकारी सचिन निकम, सिद्धार्थ खंडाळे, धाटाव गावचे ग्रामस्थ, पत्रकार उपस्थित होते.