स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक ते दहा लोकसंख्येच्या शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेला देशात 27 वा तर राज्यात 2 रा क्रमांक

 *स्वच्छ सर्वेक्षणाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर कोकण विभागातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी उमटविली मोहोर*


स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक ते दहा लोकसंख्येच्या शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेला देशात 27 वा तर राज्यात 2 रा क्रमांक 


अलिबाग, जि.रायगड,दि.20 (जिमाका): स्वच्छ सर्वेक्षणाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार मिळाले असून

रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेने आणि कर्जत व खोपोली नगरपरिषदांनी विविध गटातील राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे. 

      याबरोबरच कोकण विभागातील ठाणे, नवी मुंबई, या महापालिकांनी तर खेड, कुळगाव-बदलापूर या नगरपरिषदांनी आणि मुरबाड, शहापूर या नगरपंचायतींनीही विविध गटातील राष्ट्रीय पुरस्कार पटकविण्यात यश संपादन केले आहे.

     पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, आयुक्त श्री.गणेश देशमुख,उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, ,महिला बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेवक गणेश कडू, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

     स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पनवेल महापालिकेला 1 ते 10 लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशांमध्ये 27 वा क्रमांक मिळाला असून राज्यामध्ये 2 रा क्रमांक मिळाला आहे.

      स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सहभागी होत यावर्षी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आल्या. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे संदेश प्रसारित करणाऱ्या आकर्षक रंगचित्रांनी सजलेली भिंतीचित्रे, शहरातील शौचालये शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर, सायकल रॅली, विविध टाकाऊ वस्तूंसाठी रिड्युस, रि-यूज, रि-सायकल या संकल्पनांवर आधारित स्वच्छता रथ महापालिकेने बनविले आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी ,अधिकारी, कर्मचारीवृंदाने व स्वच्छता मित्रांनी केलेले स्वच्छताविषयक काम आणि त्याला नागरिकांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पनवेल महानगरपालिकेस स्वच्छतेचा हा बहुमान प्राप्त झाला आहे.

      मोठ्या लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाचे सर्वोत्तम स्वच्छ शहराचा पुरस्काराने नवी मुंबईला गौरविण्यात आले आहे.

     कोकण विभागातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या याकामाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यंत्रणेचे अभिनंदन करीत नागरिकांचे आभार मानले आहेत.

       आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.    

       यावेळी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  

*पुरस्कार आणि महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे :*

*अमृत "स्वच्छ शहर" पुरस्कार :* नवी मुंबई महानगरपालिका,  पनवेल महानगरपालिका तसेच खोपोली नगरपरिषद

*कचरामुक्त शहरांचे  स्टार मानांकन*

*अमृत -कचरामुक्त शहरांचे प्रमाण‍ित ३ स्टार मानांकन पुरस्कार :*

नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे, पनवेल महानगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर  नगरपरिषद

*नॉन अमृत कचरामुक्त शहरांचे प्रमाणित ३ स्टार मानांकन पुरस्कार:* कर्जत नगरपरिषद, खोपोली आणि खेड नगरपरिषद तसेच मुरबाड आणि शहापूर नगरपंचायत.

*पुरस्कारांवर महाराष्ट्राचीच मोहोर…*

आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.  वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 147 शहरांचा समावेश  आहे. यामध्ये राज्यातील 55 शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 143 शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील 64 शहरांचा समावेश आहे. फाईव्ह स्टार मानांकनामध्ये देशभरातील 9 शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई शहराचा समावेश असून नवी मुंबई महानगरपालिकेला  कोटी रूपयांचा धनादेश बक्ष‍िस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण 48 शहरांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये  राज्यातील 27 शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये राज्यातील 56 शहरे आहेत तसेच यामध्ये पहिली वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत.

      स्वच्छ सर्वेक्षणाच्या एकूण कामगिरीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला देण्यात आला असून राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्विकारला. त्यांच्यासमवेत राज्य स्वच्छता मिशन (नागरी) अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.