महाडचे ऐतिहासिकपण जपण्यासाठी सरकार कटिबध्द : ना.एकनाथ शिंदे
*महाडकरांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सरकार भक्कम पाठीशी*
*ना.बाळासाहेब थोरात*
*महाडच्या विकासासाठी स्नेहल जगताप यांना एकत्रितरित्या बळ द्या*
*-नाना पटोले*
*इंदू मिलप्रमाणे चवदार तळ्याचे सुशोभिकरण करणार*
*पालकमंत्री कु.आदिती तटकरे*
*प्रशासकीय भवन हे महाडचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाल्याची साक्ष*
*खासदार सुनिल तटकरे*
*महाडचे वैभव राखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार*
*आमदार भरतशेठ गोगावले*
*सर्वाच्या सहकार्यामुळेच महाड पुन्हा उभे राहिले*
*नगराध्यक्षा स्नेहल जगताप*
अलिबाग,जिल्हा रायगड दिना 16 (जिमाका):-महाडचे अष्टपैलू नेते स्वर्गीय माणिक जगताप यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या महाड नगरपरिषदेच्या श्री शिवाजी महाराज प्रशासकीय भवनातून जनतेला न्याय देण्याचे काम व्हावे, असे आवाहन करीत महाडला असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी जपण्याचे काम हे शासन करेल, असे आश्वासन नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज महाड येथे दिले. यावेळी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी महापूराच्या महाभयंकर संकटाला सामोरे जाऊन पुन्हा धैर्याने उभे राहिलेल्या महाडकरांचे सर्व प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे अभिवचन दिले.
महाड नगरपरिषदेच्या श्री शिवाजी महाराज प्रशासकीय भवनाचे लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, नाना पटोले, पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, दि.अण्णासाहेब सावंत को.ऑप. अर्बन बँकेच्या चेअरमन श्रीम. शोभाताई सावंत, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, हनुमंत जगताप, महेंद्र घरत, अविनाश लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुराच्या संकटाच्या वेळी महाडला पुन्हा उभे करण्यासाठी आपण जे सहकार्य केले, ते आपले कर्तव्यच होते. शेकडो हात ज्यावेळी एकत्र येतात त्याचवेळी आपण अशा संकटांवर मात करू शकतो. भविष्यात अशी संकटे येऊ नयेत म्हणून शासनाचा ॲक्शन प्लॅन तयार होत आहे. शेवटी शासन हे जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी असते,यासाठी नगर विकास, नगरोत्थान खाते वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रस्ते, साकव आदी कामांसाठी निधी दिला जाईल,असे सांगून नगरविकास खात्यातील अनेक नियम बदलण्यात आले असून आता कोणत्याही परवानगीशिवाय घर बांधता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या योग्य नियोजनामुळे आपण करोनाचा अटकाव करू शकलो, असे श्री.शिंदे यांनी सांगितले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माणिकराव जगताप यांच्या रुपाने कठीण प्रसंगी प्रश्न सोडविणारा हक्काचा माणूस कोकणाने गमावला आहे. आपण 26 जुलै रोजी महाड मध्ये आलो असताना एक वेळ पूराचे संकट निभावून नेऊ परंतु माणिकरावांची पोकळी मात्र भरून येवू शकणे शक्य नाही, अशा भावना महाडकरांकडून ऐकायला मिळाल्या. मात्र माणिकराव स्नेहलच्या रुपाने खंबीर नेतृत्व मागे ठेवून गेले. स्नेहलच्या रुपाने महाडकरांना चांगले नेतृत्व मिळाले असून सर्वानी एकत्रितपणे तिला बळ द्या, असे भावनिक आवाहन केले. ते पुढे म्हणाले, महाडच्या पूर नियंत्रणासाठी आमदार श्री.गोगावले यांनी सुचविल्यानुसार धरण बांधणे, हा प्रस्ताव योग्य असल्याचे सांगून संबंधित बाबींचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवून पूर रोखण्यासाठी व नियंत्रणासाठी एकत्रितरित्या पाठपुरावा करू या, असे सांगितले.
श्री.नाना पटोले यांनी माणिकराव जगताप यांच्या निधनाने कोकणचे मोठे नुकसान झाले आहे. कोविडच्या संकटात जनतेचे जीव वाचावेत म्हणून त्यांनी कोविड सेंटर सुरु केले. स्वतः मृत्यूच्या दारात असतानाही महाडकरांना पूरासारख्या संकटातून सावरण्यासाठी त्यांनी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना तातडीने महाड मध्ये जनतेच्या मदतीसाठी पाठविले.महाडमधील क्रांतीस्तंभाचे सुशोभिकरण करण्याची इच्छा स्व.माणिकराव यांनी व्यक्त केली होती, त्यासाठी या जागेची मालकी असणाऱ्या संस्थेने सहकार्य करण्याचे आवाहन श्री.पटोले यांनी केले.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी नकारात्मक बाबी बाजूला सारून, यापूर्वीचे आपापसातील गैरसमज दूर करून सर्वांनी नव्याने सुरुवात करू या, असे आवाहन करून नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या कारकिर्दीत महाड नगर परिषदेने राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले असून भविष्यातही असेच पुरस्कार प्राप्त करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची स्थापना होण्यापूर्वी झालेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये किल्ले रायगड च्या संवर्धनासाठी २० कोटी देण्याची घोषणा केली होती याचे स्मरण करून देत इंदू मिलमधील स्मारकाप्रमाणेच चवदार तळे येथील सौदर्यीकरण व विकास तसेच श्री विरेश्वर तलाव सुशोभिकरण केले जाईल त्याचप्रमाणे महाड मधील म्हाडाच्या जागेचाही वाढत्या शहरीकरणाचा विचार करून विस्तार केला जाईल, असे आश्वासन दिले.
खासदार सुनिल तटकरे यांनी महाड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविणारे सुरबानाना टिपणीस, नानासाहेब पुरोहित, शं.बा.सावंत, अण्णासाहेब सावंत यांसारख्या महान विभूतींचे उत्तरदायित्व सांभाळण्याची संधी स्नेहल जगताप यांना मिळाली, हे त्यांचे भाग्य असून मिळालेल्या या संधीचे स्नेहलने सोने केले, अशा शब्दात नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांची स्तुती केली. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जसे अनेक संकटांना सामोरे गेले त्याचप्रमाणे महाडकर देखील प्रत्येक संकटाला सामोरे गेले. या भागावर आलेल्या अस्मानी संकटावर मात करून नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगरपरिषदेचे प्रशासकीय भवन उभे राहिले आहे. हे देखणे प्रशासकीय भवन महाडचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून दिल्याची साक्ष देत आहे, असे श्री.तटकरे यांनी सांगितले. पुढील पावसाळ्यापूर्वी महाडमध्ये येणारा पूर रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण करून २०२२ साली महाडला पूर येणार नाही,असे काम पूर्ण होणे, हीच माणिकराव जगताप यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी पालिकेच्या नवीन वास्तूमधून चांगला कारभार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून महाड शहराचे ऐतिहसिकपण टिकवायचे असेल तर पूरग्रस्तांना सरसकट मदत करावी आणि नदी पात्रातील गाळ काढून अपूर्ण असणाऱ्या धरणांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली. महाडचं वैभव राखण्यासाठी सर्वजण एकत्रित येऊ, अशी ग्वाही श्री.गोगावले यांनी यावेळी दिली.
सुरुवातीस आपल्या मनोगतामध्ये पूरासारख्या अस्मानी संकटामधून महाड शहर सर्वाच्या सहकार्यामुळेच पुन्हा नव्याने उभे राहू शकले, ना. एकनाथ शिंदे यांनी महाडचे पालकत्व स्विकारुन स्वच्छतेसाठी सर्व यंत्रणा उभी केली, तातडीने निधी उपलब्ध करून दिला, याबद्दल ऋण व्यक्त केले. भविष्यात महाडच्या सौदर्यात वाढ होऊन महाडचे गतवैभव प्राप्त होण्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
श्रीमती शोभाताई सावंत यांनी आपल्या मनोगतातून स्नेहल जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी तर सूत्रसंचालन सुधीर शेठ यांनी केले.
सुरुवातीस मंत्री महोदय व उपस्थित मान्यवरांनी चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक,, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवराय, हुतात्मा स्मारकातील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर संत रोहिदास सभागृह व महाड नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवनाचे लोकार्पण संपन्न झाले.