झेनिथ धबधबा येथे घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केली तातडीची पाहणी
*पोलिस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने केल्या तातडीच्या उपाययोजना*
अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका):- काल (दि.28सप्टेंबर) रोजी खोपोली नजीकच्या झेनिथ धबधबा या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज (दि. 29 सप्टेंबर 2021) रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व खोपोली नगरपालिका मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी संयुक्तपणे "झेनिथ धबधबा" व आजूबाजूच्या परिसरास भेट देवून काल घडलेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने संयुक्त पाहणी केली.
त्यांनी झेनिथ धबधब्याकडे जाणाऱ्या नियमित व छुपे मार्ग आणि पायवाटांची पाहणी केली. त्यानुसार धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. तसेच 02 पोलीस कर्मचारी व खोपोली नगरपालिकेचे 02 कर्मचारी यांना मुख्य मार्गावर नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रांताधिकारी,कर्जत यांच्या मनाई आदेशाचा सूचना फलकही या ठिकाणी लावण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीबाबत देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, तसेच धबधबा, समुद्रकिनारे, गड किल्ले, धरण या क्षेत्रात पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नागरिकांना केले आहे.