महिला व बालविकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी उज्वला योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका) :- अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून उज्वला योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केलेल्या स्त्रिया व मुलींचे स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून संगोपन, शिक्षण व प्रशिक्षण देवून पुर्नवसन केले जाते. ही योजना प्रतिबंध, सुटका, पुर्नवसन, पुर्नएकात्मिकरण आणि पुर्नप्रत्यार्पण असे पाच घटकाअंतर्गत राबविण्यात येते. त्यानुषंगाने महिला व बालविकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्या स्वयंसेवी संस्था उज्वला योजना राबवू इच्छितात, त्या संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तात्काळ सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रविण पाटील यांनी केले आहे.
उज्वला योजनेकरिता अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- उज्वला योजना राबविण्यास इच्छुक संस्था नोंदणी अधिनियम 1861 अंतर्गत नोंदणीकृत असावी व संस्थेचे स्वतंत्र घटनापत्रक व त्यात संचालक मंडळाचे अधिकार, कर्तव्य व जबाबदारी यांचा स्पष्टपणे उल्लेख असावा, उज्वला योजना राबविणारी संस्था व्यक्तीच्या /संस्थेच्या वैयक्तिक फायद्यासाठी कार्यरत नसावी. प्रत्येक
संस्थेत किमान 50 महिलांसाठी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे, संबंधीत संस्थेस अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणे या विषयामध्ये कार्यरत असल्याचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असावा, संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असावी, संस्थेचा वार्षिक ताळेबंद किमान 20 लाख रुपये असावा तसेच किमान 15 लाख रुपये मुदतठेव व गुंतवणुक असणे आवश्यक आहे. ही योजना राबविण्यासाठी प्रशिक्षित वर्ग असणे आवश्यक आहे, ही योजना राबविण्याच्या संस्थेकडे निकषानुसार आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे, योजना राबविण्यासाठी इच्छुक संस्था त्याच जिल्ह्यातील असावी, ही योजना राविणारी संस्था निती आयोगाच्या दर्पण या पोर्टल नोंदणीकृत असावी, प्रतिबंध किंवा सुटका हे घटक राबविणाऱ्या संस्था योजनेअंतर्गत मान्यता देण्यात येणार नाही. या योजनेचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, रायगड-अलिबाग, नीलपुष्प बिल्डिंग, नागडोंगरी, चेंढरे एमआयडीसी कार्यालयासमोर, अलिबाग, दूरध्वनी क्र. 02141-295321, Email ID: wcdora@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रविण पाटील यांनी केले आहे.