पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी समस्येसह मालमत्ता कराबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आयुक्तांची भेट

पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी समस्येसह मालमत्ता कराबाबत 

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आयुक्तांची भेट



पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जाचक मालमत्ता कर प्रणाली विरुद्ध स्व.दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आता पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेवून या विषयावर मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यात आली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्याचा पाठपुरावा म्हणून यावेळी पालिका आयुक्तांची भेट घेण्यात आली. यामध्ये मालमत्ता करासह पालिका हद्दीतील पाणी प्रश्न आणि नागरिकांना होत असलेला मनस्ताप यावरही चर्चा करण्यात आली. 

समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यावर निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून गेले दीड वर्षे प्रयत्न सुरू आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करीत तसेच ठिकठिकाणी बैठका घेवून नागरिकांचे विचार एकूण सदर प्रक्रिया सुरू ठेवली आहे. मुंबई, ठाणे येथे ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी असताना पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मात्र नागरिकांवर अन्यायकारक कर लादला जात आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्यावतीने लादला गेलेला मालमत्ता कर हा रद्द करण्यात यावा अशी मागणी समितीच्या वतीने मांडण्यात आली होती. याबाबत ज्या पद्धतीने मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये ५०० फुटांपर्यंत कराबाबत माफी देण्यात आली आहे त्या पद्धतीने पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनाही या करामध्ये माफी मिळावी यासाठी स्व.दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा पालिका आयुक्तांची भेट घेतली.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल महानगर पालीकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, शेकापचे जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, शिवसेनेचे  तालुका संघटक भरत पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत , यतीन देशमुख, पनवेल शहर प्रमुख अच्युत मनोरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपण योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.