कर्जे व ठेवींच्या वृद्धीमध्ये,पहिल्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अग्रस्थनावर
पुण्यात मुख्य कार्यालय असणाऱ्या या बँकेने 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत एकूण कर्जांमध्ये रु. 1,10,592 कोटी पर्यंत म्हणजे 14.46% वृद्धी नोंदवली. (बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार). त्यानंतरच्या क्रमांकावर असलेल्या पंजाब आणि सिंध बँकेची एकूण कर्जे रु. 67,933 कोटी पर्यंत म्हणजे 10.13% इतकी वाढली.
ठेवी गोळा करण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रची 14% वृद्धी पंजाब आणि सिंध बँकेपेक्षा थोडी कमी होती, तर देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने 8.82% वाढ नोंदवली.
परंतु प्रत्यक्ष आकडेवारीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एकूण ठेवी बँक ऑफ महाराष्ट्राच्या रु. 1.74 लक्ष कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे 21 पट जास्त होत्या. (रु. 37.20 लक्ष कोटी). चालू खाती व बचत खाती (CASA) यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने 22% वाढ नोंदवली जी या तिमाहीत सार्वजनिक बँकांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे बँकेच्या एकूण दायित्वामध्ये त्यांचे प्रमाण 53% (रु. 92,491 कोटी) आहे. जून 2021 च्या अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय 14.17% वाढून 2.85 लक्ष कोटी पर्यंत गेला.
पहिल्या तिमाहीत बँकचा निव्वळ नफा रु. 208 कोटी म्हणजे गतवर्षीच्या याच कालखंडाच्या रु. 101 कोटीच्या दुपटीपेक्षा जास्त झाला.
बँकेच्या कर्जांची गुणवत्ता पुष्कळ सुधारली. एकूण थकित कर्जांचे प्रमाणे जून 2021 अखेरीस एकूण कर्जांच्या 6.35% होते. गत आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस हे प्रमाण 10.93% होते. प्रत्यक्ष आकड्यांमध्ये एकूण थकीत कर्जे जून 2021 अखेरीस रु. 7,022 कोटी इतकी होती. गतवर्षीच्या याच कालखंडामध्ये रु. 10,558.53 इतकी नोंदवली गेली.
निव्वळ थकीत कर्जे 2.22% (रु. 2,352.75 कोटी) इतकी म्हणजेच गतवर्षीच्या 4.10% (रु. 3,677.39 कोटी) च्या जवळपास अर्धी झाली.