दैनिक युवक आधारच्या २०२६ सालच्या दिनदर्शिकेचे दिमाखदार प्रकाशन
पनवेल प्रतिनिधी
दैनिक युवक आधार या विश्वासार्ह आणि लोकाभिमुख वृत्तपत्राच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या २०२६ सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडले. पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि वाचकाभिमुख माहिती यांचा संगम असलेल्या या दिनदर्शिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दैनिक युवक आधारचे संस्थापक संपादक संतोष शिवदास आमले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांना प्राधान्य देत वाचकांशी नाते जोडले आहे. याच परंपरेत २०२६ सालची दिनदर्शिका माहितीपूर्ण, आकर्षक व उपयुक्त स्वरूपात साकारण्यात आली आहे.
या दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात घराघरात असणारी दिनदर्शिका ही केवळ तारखा पाहण्याचे साधन राहिलेले नसून ती ज्ञान, माहिती आणि संस्कार देणारे माध्यम ठरले आहे. दैनिक युवक आधारची ही दिनदर्शिका अत्यंत सुंदर रचना, अचूक माहिती आणि उपयुक्त संदर्भांनी परिपूर्ण असून घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला निश्चितच मार्गदर्शक ठरेल.”
या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, रायगड ग्राम सिटीचे संपादक अण्णासाहेब आहेर, रायगड टाइम्सचे प्रतिनिधी राम बोरले, दैनिक युवक आधारचे संपादक संतोष शिवदास आमले, सहसंपादक मुकुंद कांबळे, मुंबई विभाग संपादक किशोर गुडेकर, पनवेल तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र पाटील, पनवेल प्रतिनिधी जगदीश क्षीरसागर यांच्यासह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दैनिक युवक आधारच्या सामाजिक बांधिलकीचे व वस्तुनिष्ठ पत्रकारितेचे कौतुक करत भविष्यातही अशाच उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा दिल्या.
दिनदर्शिकेच्या प्रकाशनानिमित्ताने संपादक संतोष शिवदास आमले यांनी सर्व मान्यवरांचे व वाचकांचे आभार मानत, दैनिक युवक आधार ही केवळ बातमी देणारी नाही तर समाजाचा आवाज बनणारी माध्यम संस्था असल्याचे नमूद केले.
