पनवेल महानगरपालिकेत भाजपची विकासाची घोडदौड; प्रभाग १८ मधून ममता म्हात्रे यांची बिनविरोध निवड
पनवेल: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने पनवेल महानगरपालिकेत सुरू ठेवलेल्या सर्वांगीण विकासाच्या कामाची पोचपावती आणि जनसामान्यांचा पक्षावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधून सौ. ममता प्रितम म्हात्रे यांची नगरसेविका पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
विकासाभिमुख कार्यपद्धतीचा विजय गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेलमध्ये विविध विकासकामांचा धडाका सुरू आहे. ही बिनविरोध निवड म्हणजे केवळ एका जागेचा विजय नसून, जनतेने आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर दाखवलेला ठाम विश्वास आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. सौ. ममता म्हात्रे यांच्या निवडीने प्रभागातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.
प्रितम म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा या यशाबद्दल बोलताना पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे म्हणाले की, "ही निवड म्हणजे विकासाच्या राजकारणाची आणि पारदर्शक कारभाराची पोचपावती आहे. सौ. ममता म्हात्रे यांच्यासह पनवेल महानगरपालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आगामी काळात अधिक जोमाने जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प आहे."
या ऐतिहासिक निवडीबद्दल संपूर्ण पनवेल भाजप परिवाराकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
