महानगरपालिका मुख्यालयात मराठी एकीकरण समितीची बैठक
पनवेल .30 : पनवेल महानगरपालिका मुख्यालयामध्ये आज मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे मराठी भाषा संवर्धनाबाबत चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार आज झालेल्या बैठकीत मराठी भाषा समितीच्या विविध मागण्यांबाबत परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी चर्चा केली.
या बैठकित महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी दुकानांवरील नामफलक मराठी भाषेतूनच असावेत, विविध ठिकाणांचे शासकीय व खासगी सूचना फलक मराठीतूनच असावेत, विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मराठीचा जास्तीत जास्त वापर, राष्ट्रगीतासोबतच राज्यगीताचा वापर अशा अनेक मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी शासन निर्देशानुसार 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या अभिजात मराठी भाषा संवर्धन सप्ताहातील प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा, व्याख्यान, प्रदर्शन अशा विविध उपक्रमांची तपशीलवार माहिती मराठी एकीकरण समितीस देण्यात आली.
मराठीच्या वापरासाठी पनवेल महानगरपालिका सकारात्मक आणि प्रयत्नशील असल्याचे यावेळी परिवहन व्यवस्थापक गावडे यांनी सांगितले. यावेळी सामान्य प्रशासन विभाग प्रमुख किर्ती महाजन, जनसंपर्क अधिकारी नितीन साके, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

