सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या सुरांनी कामोठेतील दिवाळीचा आनंद द्विगुणित

 

सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या सुरांनी कामोठेतील दिवाळीचा आनंद द्विगुणित



पनवेल (प्रतिनिधी ) दीपावली सणाच्या मंगलमय वातावरणात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आयोजित दिवाळी संध्या या सुश्राव्य संगीत मैफलीला कामोठेवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हिच्या बहारदार गायकीने श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले, ज्यामुळे कामोठे येथील दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
हा कार्यक्रम कामोठे सेक्टर 6मधील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये बुधवारी झाला. भारतीय जनता पक्ष, पनवेल यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आर्या आंबेकर यांनी विविध मराठी भावगीते, नाट्यगीते आणि चित्रपट गीतांचे सादरीकरण केले. तिने आपल्या गोड आवाजात सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी उपस्थितांना दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन टाकले. कामोठे येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या संगीत मैफलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
दिवाळीच्या निमित्ताने पनवेल महानगरातील नागरिकांना एक दर्जेदार सांस्कृतिक मेजवानी मिळावी, या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सांगीतिक सुरांनी नटलेल्या या 'दिवाळी संध्या'मुळे कामोठे परिसरातील रसिकांना दिवाळीच्या दिवसांत एक अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव घेता आला.
या सोहळ्यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका अरुण भगत, कुसुम म्हात्रे, जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे, युवानेते हॅप्पी सिंग, रवी गोवारी, हर्षवर्धन पाटील, अभिषेक पटवर्धन, युवा मोर्च्यामोचा शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी कामोठे पोलीस ठाण्याच्या विमल बिडवे यांनी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोन सतर्क राहण्याचे आवाहन केले.