ढोरोशी शाळेचे मुख्याध्यापक संतोष निकम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
तारळे/प्रतिनिधी,दि.११-सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरोशीचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक संतोष निकम सर यांचा ढोरोशी ग्रमस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
२०२४-२५ या वर्षाच्या पाहणी अहवालात जिल्हा परिषद साताराची ढोरोशी प्राथमिक शाळा पाटण तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यात प्रथम आली असून यामध्ये पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री.संतोष निकम यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेची पूर्व किर्ती कायम राखली.या भावनेतून ढोरोशी ग्रमस्थांनी पक्षभेद विसरून निकम सरांचा हृद्य सत्कार केला.
याप्रसंगी व्यासपीठावर ढोरोशी गावचे प्रथम नागरिक,सरपंच महेंद्र मगर,माजी सरपंच नारायण मगर,मा.ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मगर,विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तात्याबा मगर,ढोरोशी गावचे सुपुत्र आणि माजी शिक्षणाधिकारी सन्माननीय राजाराम भंडारे सर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक संतोष सावकार,प्रविण काटे,जनार्दन पवार त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई याचे ढोरोशी गावातील उजवे हात मानले जाणारे निवृत्त सैनिक अनिल यादव उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेचा आणि मुख्याध्यापक निकम सरांचा गौरव केला आणि पुढील दैदिप्यमान कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.माजी सैनिक अनिल यादव यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावतीने निकम सरांचे अभिनंदन करताना,आपली शाळा तालुक्यात आणि जिल्ह्यात पहिली आलीच आहे; आता ती राज्यात सुद्धा पहिली येईल असा आशावाद व्यक्त केला.
सभागृहात आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य,विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी आणि विविध मंडळांचे अध्यक्ष,पदाधिकारी आणि वाघळवाडी,बहिरेवाडी,शिवपूरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.