भाजपची कोकण विभागीय आढावा बैठक संपन्न
पनवेल (प्रतिनिधी) गेल्या ११ वर्षांतील मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने भक्कम पावले टाकली आहेत. 'संकल्प से सिद्धि तक' या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित, केंद्र सरकारच्या यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प भाजपा महाराष्ट्र प्रदेशने हाती घेतला आहे. या अभियानाच्या अनुषंगाने ठाणे-कोकण विभागीय आढावा बैठक प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात संपन्न झाली. या बैठकीत कोकणातील संघटनात्मक बांधणी, बूथ पातळीवरील व्यवस्थापन तसेच लोकांपर्यंत प्रभावीपणे संवाद साधण्याच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली.
कमळ हे केवळ चिन्ह नसून, भाजपाच्या विचारसरणीचे प्रतीक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या वेशात कमळ परिधान करून अभिमानाने भाजपा प्रतिनिधित्व करावे. आणि मोदी सरकारच्या विकासकार्यांचा घरोघरी प्रचार करणे ही काळाची गरज आहे आणि हे कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचे दायित्व समजून पार पाडावे अशा सूचना उपस्थितांना करण्यात आली. हे अभियान म्हणजे केवळ माहितीप्रसार नव्हे, तर एक जनतेशी भावनिक नातं निर्माण करण्याचा संकल्प आहे ज्यातून २०२४ नंतरची नवी भारतनिर्मिती अधिक भक्कम होणार आहे, असेही रवींद्र चव्हाण यांनी म्हंटले.
या बैठकीला खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण विभागीय संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, सरचिटणीस दिपक बेहरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, खोपोली शहर मंडळ अध्यक्ष राहूल जाधव, खालापूर पूर्व मंडल अध्यक्ष सनी यादव, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, विकास खुरपूडे, चंद्रप्पा अनिवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमावेळी खोपोली नगरपालिका क्षेत्रातील उद्योजक यशवंत साबळे, सुहास वझरकर, मंगेश सुर्वे, युवा उद्योजक विक्रम साबळे, अजिंक्य तावडे, माजी नगरसेवक अविनाश तावडे, गगणगिरी मित्र मंडळ अध्यक्ष महेंद्र खोत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते भिमा मोरे, ईरशाद खान, चिराग रावळ, अतूल पवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. त्यांचे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रवेश कर्त्यांचे पक्षात स्वागत केले.