राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील 162 विद्यार्थी झळकले
घणसोलीगाव शाळेतील स्वराली जगधने जिल्ह्यात तिसरी व नवी मुंबईत सर्वप्रथम
राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील यश खरगे नवी मुंबईत व्दितीय
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दरवर्षी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे आयोजन केले जाते. सदर परीक्षा शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये महानगरपालिका शाळांमधून 1125 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 162 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले असून त्यांच्या यशामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व्हिजनच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42, घणसोली गाव मधील स्वराली विठ्ठल जगधने ही विद्यार्थिनी ठाणे जिल्ह्यातून तिसरी आली असून नवी मुंबईतून प्रथम क्रमांकाने यशस्वी झालेली आहे.
तसेच नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 55, राजश्री शाहू महाराज विद्यालय, आंबेडकर नगर, कातकरी पाडा, रबाळे येथील यश तुळशीराम खरगे हा विद्यार्थी गुणानुक्रमे नवी मुंबईतून व्दितीय क्रमांकांने शिष्यवृत्तीप्राप्त ठरलेला आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी (SAT) आणि बौद्धीक क्षमता चाचणी (MAT) असे दोन पेपर निश्चित केलेले असतात. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोटयाप्रमाणे जिल्हानिहाय आणि संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थाना दरवर्षी 16 हजार रुपये शिष्यवृत्ती चार वर्षांपर्यंत (इयत्ता नववी ते बारावी) दिली जाते.
या परीक्षेमध्ये शासकीय तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थीही परीक्षेस बसले होते. या परीक्षेत इयत्ता सातवी मध्ये किमान 55% गुण मिळवलेले इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरतात. तसेच त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न 3.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक असते.
नमुंमपा शाळेतून या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून जादा तासिका घेऊन मार्गदर्शन केले गेले. शिक्षकांमार्फत या विद्यार्थ्यांचा नियमित सराव घेण्यात आला. शाळा व केंद्र स्तरावर सराव परीक्षेचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून परीक्षेत उत्तम गुण प्राप्त झाल्याचे दिसून आले.
या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विशेष कौतुक केले असून अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव यांनीही या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरांतून या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक होत आहे.