सायन पनवेल महामार्ग,रेल्वे स्थानके व परिसर स्वच्छतेकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष लक्ष
नवी मुंबई/प्रतिनिधी- नवी मुंबई शहराची ओळख प्रामुख्याने स्वच्छ व सुंदर शहर असून यामध्ये नागरिकांच्या सहभागाचा मोठा वाटा आहे. नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छतेला विशेष प्राधान्य देत असते.
महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांमध्ये सायन पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून या महामार्गावर जड वाहनांची कायम वर्दळ असते. त्याचप्रमाणे जेएनपीटीकडे जाण्यासाठीही या रस्त्यावरुनच वाहतूक होते. त्यामध्ये बांधकाम साहित्य वाहून नेणा-या जड वाहनांचाही समावेश होतो. त्यामुळे या रस्त्याची नियमित स्वच्छता हे एक आव्हान आहे.
यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे या महामार्गाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष असून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्गाच्या दुतर्फा सातत्याने सखोल स्वच्छता मोहीमा आयोजित करण्यात येत असतात. येथील सातत्यपूर्ण स्वच्छतेबाबत आयुक्तांनी आढावा बैठकीत महानगरपालिकेच्या वतीने विशेष पथक गठीत करण्याचे निर्देश दिले असून या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांसमवेत नियमित संपर्कात राहून सायन पनवेल महामार्गावरील स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देण्याचे व नियमित स्वच्छ राहील या कडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
अशाच प्रकारे नवी मुंबईतील 12 रेल्वे स्थानके व परिसर येथील स्वच्छतेची जबाबदारी सिडको महामंडळाकडे असून सर्व रेल्वे स्थानके मोठया प्रमाणात वर्दळीची ठिकाणे आहेत. महामार्ग स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या पथकाने सिडकोच्या अखत्यारितील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेकडेही बारकाईने लक्ष द्यावयाचे असून या कामी सिडकोच्या संबधित अधिका-यांशी नियमित संपर्कात राहून हे काम करुन घ्यावयाचे आहे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये पूर्वेकडील बाजूस मोठया प्रमाणात एमआयडीसी क्षेत्र असून त्याठिकाणच्या स्वच्छतेकडेही प्राधान्याने लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आलेले आहेत. एमआयडीसी क्षेत्रात मोठया प्रमाणात दुर्लक्षित जागा असून अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी डेब्रीज आणून टाकण्याचे प्रकार अनेकदा घडताना दिसतात. डेब्रीजमुळे शहर स्वच्छतेला बाधा पोहचते हे लक्षात घेउुन डेब्रीज विरोधी पथकांना अधिक सक्रिय करावे व एमआयडीसी अधिका-यांच्या सहकार्याने एमआयडीसी परिसरही स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देशित केले आहे.
स्वच्छ नवी मुंबईसाठी संबधित सर्व प्राधिकरणांचे सक्रिय सहकार्य अपेक्षित असून त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, रेल्वे, एमआयडीसी अशा सर्व संबधित प्राधिकरणांशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवून बारकाईने लक्ष देत नियमित काम करावे असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.