सीकेटी महाविद्यालय व विद्यालयातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधान मंडळ प्रत्यक्षण भेट

 सीकेटी महाविद्यालय व विद्यालयातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र विधान मंडळ प्रत्यक्षण भेट




पनवेल(प्रतिनिधी) तरुणांचे राष्ट्र, जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी बहुविध बिरुदे असणाऱ्या देशातील तरुणांमध्ये संसदीय लोकशाहीच्या मूल्यांचे रोपण करण्यासाठी तथा राज्यविधिमंडळाच्या विधीनिर्मिती प्रक्रियेबाबत महाविद्यालयीन व माध्यमिक विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालय, नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर ठाकूर इंग्रजी माध्यमिक स्कुलमधील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या चमूने आज (दि. १७)  महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला भेट दिली.

          महाराष्ट्राचे विधानभवन ही सर्वासाठी पवित्र वास्तू आहे. लोकशाहीचे महत्व आणि महानता या वास्तूच्या कानाकोपऱ्यातून जाणवते. विद्यमान आणि भावी पिढीला मार्गदर्शक असलेली अनेक ऋषीतुल्य माणसं या वास्तुनं बघितली, लोकशाहीची मूल्ये जोपासून राज्याला कायद्याच्या चौकटीत बांधणाऱ्या या कायदेमंडळाच्या इमारतीचं राजकीय नेत्यांना, कार्यकत्यांना जेवढं आकर्षण आहे तेवढंच समाजाच्या इतर घटकांना देखील आहे. आणि त्या अनुषंगाने राज्यातील विविध शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी, काही शिष्टमंडळे अभ्यास दौऱ्यांतर्गत येथे येत असतात. त्यानुसार विद्यार्थी व प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने विधिमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून पाहिले. यावेळी सभागृहात चालणाऱ्या कामकाजाची त्यांनी माहिती घेतली. दोन्ही सभागृहाचे कामकाज पार पडल्यानंतर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या चमू सोबत मुक्त संवाद केला व अश्या प्रकारच्या विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या सातत्यपूर्ण आयोजनाबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.आकाश पाटील, भुगोल विभागाचे प्रमुख डॉ. दीपक नारखेडे, गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष उन्हाळे, अर्थशास्त्र वरिष्ठ प्राध्यापक काकासाहेब ढवळे, चांगू काना ठाकूर इंग्रजी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका मनिषा नारखेडे, उमेश पोद्दार आदी उपस्थित होते.