मुंबईच्या धर्तीवर पनवेलला स्वयंपुनर्विकास! ; पुढील महिन्यात सोसायट्यांची बैठक

मुंबईच्या धर्तीवर पनवेलला स्वयंपुनर्विकास! ; पुढील महिन्यात सोसायट्यांची बैठक

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार




पनवेल(प्रतिनिधी) पनवेल परिसरात विशेषतः सिडको वसाहतींमध्ये इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक बांधकाम व्यवसायिक  पुढे येत आहेत. परंतु अनेकदा त्यांच्याकडून प्रकल्प लवकर पूर्ण होत नाही. सदनिका धारकांना त्रास दिला जातो. त्याचबरोबर आवश्यक किंवा जास्त वाढीव जागा दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबईच्या धर्तीवर पनवेल येथे सुद्धा स्वयंपुनर्विकसित प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला आहे.  या संदर्भात सोसायटीची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.
         पनवेल परिसरामध्ये सिडकोने सर्वात अगोदर कळंबोली नवीन पनवेल या वसाहती विकसित केल्या. त्यानंतर खारघर, कामोठे नोड झाले. येथे सुरुवातीला प्राधिकरणाकडून इमारती बांधण्यात आल्या. त्यानंतर खाजगी व्यावसायिकांना भूखंड विक्री करण्यात आले. तेथेही बिल्डिंग उभ्या राहिल्या. त्याचबरोबर पनवेल शहरात सुद्धा इमारती बांधण्यात आल्या. दरम्यान या घरांची स्थिती फारशी चांगली नाही. विशेष करून कळंबोली आणि नवीन पनवेल येथील सिडको इमारती जुन्या झाल्या आहेत. ठिकठिकाणी स्लॅब कोसळण्याच्या घटना घडतात. त्याचबरोबर इमारतींना बाहेरून तडे गेले आहेत. पावसाळ्यात ठिकठिकाणी गळती लागते. परिणामी अनेक सदनिका धारक आपला जीव मुठीत घेऊन राहतात. या सोसायट्यांचा पुनर्विकास व्हावा त्यांना वाढीव चटाई क्षेत्र मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नवी मुंबई आणि पनवेलच्या आमदारांनी यासंदर्भात सभागृहात आवाज सुद्धा उठवला. त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीला बराच कालावधी लोटला. आता सिडको वसाहतीमध्ये इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. मात्र ते बिल्डरांना देण्यात आले आहे. मुंबईमध्ये आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व गृह चाव्या प्रदान समारंभ  संपन्न झाला. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने साकारलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीड  यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला दरेकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनाही निमंत्रित केले होते. दरम्यान आतापर्यंत मुंबईतील एकूण १५ सोसायट्यांचा पुनर्विकास आतापर्यंत झाला आहे. तर १६०० प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाले आहेत.

स्वयंपुनर्विकासाचे फायदे!
संबंधित इमारतीचा पुनर्विकास स्वतः सदनिका धारक म्हणजेच सोसायटी करते. या सभासदांना दुप्पट किंवा त्याहून अधिक मोठया क्षेत्रफळाचे घर मिळू शकतील.बिल्डरला मिळणार लाभ सदनिकाधारकांना होईल.वेगवेगळया पायाभूत सुविधांचा विकास करता येईल.त़्याचबरोबर रहिवाशी आत्मनिर्भर होतील.सर्वसामान्य  सदनिकाधारकांची फसवणुक होणार नाही.हा प्रकल्प सोसायटी करत असल्याने तो वेळेत पुर्ण होऊ शकतो.

तीन वर्षापर्यंत व्याज माफ !
बँकेचे कर्ज आणि प्रिमियम भरणे सदनिकाधारकांना कठीण होत असल्याने स्वयंपुनर्विकास प्रकल्पाकरीता तीन वर्षापर्यंत व्याज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मार्च २०२६ पर्यंत येणाऱ्या सर्व प्रस्तावांना या योजने लाभ देण्याचे सुद्धा त्यांनी जाहीर केले. त्यामुळे पनवेल मधील स्वयंपुनर्विकासालाही  त्याचा फायदा होणार आहे. मुंबईच्या धर्तीवर अशा प्रकारचे प्रकल्प राबवल्यामुळे पनवेल मधील हजारो कुटुंबीयांचे प्रशस्त घरांचे स्वप्न साकारण्यास एक प्रकारे मदत होणार आहे.

कोट-
पनवेल परिसरातही पुनर्विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशा परिस्थितीत, दोन पिढ्या किंवा त्यापेक्षाही अधिक काळापासून या भागात राहणाऱ्या रहिवाशांना  स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून त्यांच्या हक्काच्या जागेत आधुनिक घरे मिळण्याची संधी निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणि आनंद निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, पनवेल परिसरात स्वयंपुनर्विकास प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने  विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. लवकरच पनवेलकर देखील स्वयंपुनर्विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलतील, याची मला पूर्ण खात्री आहे. - आमदार प्रशांत ठाकूर