पनवेलसह राज्यातील गृहनिर्माण संस्था इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार- प्रविण दरेकर
पनवेल (प्रतिनिधी) राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या स्वयंपुनर्विकासाचे पालकत्व स्वीकारले आहे त्यामुळे पनवेलसह राज्यातील स्वयंपुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार आहे, आणि या चळवळीला वेग देण्यासाठी शासनाची सर्व मदत होणार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते व मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी आज (दि. २३) येथे व्यक्त केले.
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने व पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने "सहकारी गृहनिर्माण संस्थांचा इमारतींचा स्वयं पुनर्विकास" या विषयावर शहरातील विरुपाक्ष हॉल येथे मार्गदर्शनपर शिबिर पार पडले. या शिबिराला मार्गदर्शन करताना प्रवीण दरेकर बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रवीण दरेकर यांनी भाषणाच्या सुरुवातीला, आज हा एकप्रकारे मेळावा होत असल्याचे सांगत स्वयंपुनर्विकास या मोठ्या चळवळीचे पनवेलकर साक्षीदार होणार असून सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठी आमदार प्रशांत प्रशांत ठाकूर यांनी महत्वाचा विषय हाती घेतला असल्याचे नमूद करत त्यांचे आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच हे अभियान पनवेलमध्ये ताकदीने होणार असल्याचे जाहीर केले. विकासक त्याच्या फायद्यासाठी डेव्हलोपमेंट करतो तर स्वयंपुनर्विकासमध्ये संबंधित संस्था आणि सदनिकाधारकांचा लाभ होतो. स्वतःच्या इच्छेनुसार विकास करता येतो. स्वयंपुनर्विकास यापूर्वी होते पण आता ते चळवळ म्हणून उभी राहिले आहे आणि याला ताकद देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून या संदर्भात धाडसी निर्णय त्यांनी घेतले आहेत. मुंबईतील गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली त्यावेळी २२ हजार लोकांनी नोंदणी केली. या संदर्भातून देवेंद्रजींकडे २० विषय मांडले आणि त्यातील तब्बल १८ विषयावर शासन निर्णय झाले. चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाच्या सदनिका धारकांना त्यांच्या घरांच्या चाव्या देवेंद्रजींच्या हस्ते देण्यात आल्या त्यावेळी त्या लॊकांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या ठिकाणी ३६० स्केअर फूटच्या घराला १४०० स्केअर फुटाचे घर मिळाले आणि त्याच धर्तीवर पनवेलला मोठा फायदा होणार असून राज्यातील इतर भागातही स्वयंपुनर्विकसित प्रकल्प राबविण्यात येईल आणि यासाठी सर्वोत्तपरी मदत केली जाईल, असे आश्वासन प्रवीण दरेकर यांनी दिले. घर आयुष्याची मोठी पुंजी आहे.ते प्रत्येकाचे स्वप्न आहे आणि ते साकार करण्यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत त्यामुळे स्वयंपुनर्विकासाठी प्रत्येक सभासदाने इच्छाशक्ती ठेवली पाहिजे पैशाची कमतरता भासू देणार नाही असेही अधोरेखित केले. पनवेलमधील पहिल्या पाच इमारती सुचवा त्यांचे स्वयंपुनर्विकास करण्यासाठी मुंबै बँक पैसे देईल, तसेच पनवेलमधील इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाठी शासनाची सर्व मदत दिली असेही त्यांनी आश्वासित केले. त्याचबरोबर पुढील पिढीच्या भविष्यासाठी आत्मनिर्भर आणि स्वाभिमानाने स्वयंपुनर्विकासाठी सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, प्रवीणभाऊ दरेकर यांनी मुंबईमध्ये गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपुनर्विकास जादूच्या कांडीप्रमाणे केले आहे. आता मुंबईत विविध प्रकल्पासाठी त्यांच्याकडे रांग लागली आहे. मुंबईमध्ये आमदार प्रवीणभाऊंच्या संकल्पनेतून चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व गृह चाव्या प्रदान समारंभ संपन्न झाला. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने साकारलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आणि या कार्यक्रमाला मलाही निमंत्रित केले होते आम्ही त्या ठिकाणी दर्जेदारपणे सोसायट्यांचा पुनर्विकास झाल्याचे पहिले आणि त्या अनुषंगाने हजारो प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पनवेलमध्येही स्वयंपुनर्विकास उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि प्रवीणभाऊंची ताकद आपल्याला मिळणार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. घर आणि परिवार प्रगतीचा मूळ असतो त्यामुळे चार भिंती आणि डोक्यावर छप्पर असेल तर सुरक्षितता असते. लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्हा लोकप्रतिनिधीचे असते असे सांगून पनवेलमधील मोडकळीस आलेल्या इमारतींचे स्वयंपुनर्विकास करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरुवात झाली आहे. त्यानुसार देवेंद्रजी आणि प्रवीणभाऊंच्या मार्गदर्शनाखाली हे स्वयंपुनर्विकासाचे काम मार्गी लावून सर्वसामान्यांचे स्वप्न साकार केले जाईल आणि त्यासाठी गृहनिर्माण संस्था सदनिका धारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकाऱ्यांची टीम तयार केली जाणार असल्याचे सांगून स्वयंपुनर्विकास सर्वसामान्य सदनिकाधारकासाठी चळवळ म्हणून काम करेल, असा विश्वासही आमदार प्रशांत ठाकूर यांनी गृहनिर्माण संस्था सदनिकाधारकांना दिला.
यावेळी बोलताना आमदार विक्रांत पाटील यांनी म्हंटले कि, घर म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि आयुष्याचा संघर्ष हक्काच्या घरासाठी असतो. आणि त्यातच पुढील पिढीचा विचार करून तरुणपणात स्वतःचे पहिले घर मिळवणे हे मोठे स्वप्न असते. पुनर्विकास करताना जो प्रकल्प साकारला जाईल त्यामध्ये पैसे वाया जाऊ नये हा सर्वांची अपेक्षा असते विकासक चांगला असेल कि नसेल असा प्रश्न सर्वाना पडतो. विकासकाकांडून फसवणुकीचे प्रकार होत असतात. त्यामुळे विकासकाचा फायदा होण्यापेक्षा सदनिका धारकांचा आणि संस्थेचा विकास झाला पाहिजे त्यामुळे स्वयंपुनर्विकास हा उपक्रम महत्वाचा आहे. असेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी माजी निवृत्त सहनिबंधक राजेंद्र पवार यांनीही स्वयंपुनर्विकास संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच यावेळी संस्था, सदनिका धारकांनी उपस्थित केलेल्या प्रश्न व सूचनांना मार्गदर्शन केले. तर प्रास्ताविक पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादितचे अध्यक्ष कुंडलिक काटकर, आभार प्रदर्शन सल्लागार व माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी केले.
यांनी केले.
या कार्यक्रमाला कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादितचे सचिव भरत मोरे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका दर्शना भोईर, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष राजेश्री वावेकर, अमित ओझे, ॲड. चेतन जाधव, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, संजय भगत, रुपेश नागवेकर, महेश सरदेसाई, अभिषेक पटवर्धन यांच्यासह गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वयंपुनर्विकासाचे फायदे!
संबंधित इमारतीचा पुनर्विकास स्वतः सदनिका धारक म्हणजेच सोसायटी करते. या सभासदांना दुप्पट किंवा त्याहून अधिक मोठया क्षेत्रफळाचे घर मिळू शकतील.बिल्डरला मिळणार लाभ सदनिकाधारकांना होईल.वेगवेगळया पायाभूत सुविधांचा विकास करता येईल.त़्याचबरोबर रहिवाशी आत्मनिर्भर होतील.सर्वसामान्य सदनिकाधारकांची फसवणुक होणार नाही.हा प्रकल्प सोसायटी करत असल्याने तो वेळेत पुर्ण होऊ शकतो. मुंबईच्या धर्तीवर अशा प्रकारचे प्रकल्प राबवल्यामुळे पनवेल मधील हजारो कुटुंबीयांचे प्रशस्त घरांचे स्वप्न साकारण्यास एक प्रकारे मदत होणार आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------