पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष......!!
बाळगंगा, पोशीर, शिलार धरण प्रकल्पातुन पनवेल ला पाणी पुरवठा करण्याची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश जी महाजन यांनी केली मान्य!
महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विक्रांत दादा पाटील यांनी पनवेल शहरातील भीषण पाणीटंचाईचा मुद्दा लक्षवेधी च्या माध्यमातून जोरदारपणे उपस्थित केला. पनवेल हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून झपाट्याने वाढणारे शहर असून, येथे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील विविध भागांतून नागरिक रोजगार व उदरनिर्वाहाच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहेत.
सध्या पनवेल शहरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT प्रकल्प, विरार-अलिबाग कॉरिडॉर, नैना प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे काम सुरू आहे. तसेच, अनेक खाजगी कंपन्यांचे उद्योग प्रकल्प येथे उभे राहत आहेत. त्यामुळे पनवेल शहराची लोकसंख्या गेल्या १० वर्षांत तब्बल १९४% वाढली आहे. मात्र, शहराच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीसोबतच पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे.
पनवेलकरांना आवश्यक तेवढा पाणीपुरवठा नाही!
सध्याच्या घडीला पनवेल शहराला २२० MLD पाणीपुरवठा होतो, मात्र शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार २५० MLD पाण्याची गरज आहे. यामुळे ३० MLD पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे, जी भविष्यातील गंभीर पाणीटंचाईच्या संकटाला आमंत्रण देत आहे.
आमदार विक्रांत दादा पाटील यांनी अधिवेशनात केली ठोस मागणी
पनवेल विभागाकरिता पेण तालुक्यातील बाळगंगा, कर्जत तालुक्यातील पोशीर व शिलार या धरणातून पनवेल भागाला पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जावे ही मागणी आमदार विक्रांत दादा पाटील यांनी सभागृहात केली. त्यातील बाळगंगा धरणाचे 80%काम पूर्ण झाले असून केवळ 20%काम शिल्लक आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून यातून पाणी पुढील काही कालावधीत मिळणे शक्य आहे व दीर्घकालीन उपाययोजना म्हणून शिलार आणि पोशीर धरणात पनवेल करिता आरक्षण करावे. तसेच सध्याची 30 MLD चीं तूट भागविण्यासाठी मोरबे, हेटवने अथवा अन्य स्रोतातून तरतूद करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी त्यांनी अधिवेशनात केली.
सरकारचा सकारात्मक प्रतिसाद –
यावर उत्तर देताना माननीय जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले की, पुढील दोन वर्षांत बाळगंगा, पोशीर आणि शिलार या धरणांच्या माध्यमातून पनवेल शहराला १००% आवश्यक पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच, सध्याच्या ३०% पाणीटंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावून नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पनवेल शहराच्या आणि पनवेलकरांच्या भवितव्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून,यातून पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.
पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पनवेलकरांचा पाणी प्रश्न लक्षवेधीच्या स्वरूपात प्रभावी पणे मांडून जलसंपदा मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर प्राप्त केल्याबद्दल सर्वच स्तरांतून आ. विक्रांत दादा पाटील यांचे आभार मानले जात आहेत.
-कार्यालय, आमदार विक्रांत दादा पाटील.