पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आ.प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार
पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्या संदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वीच झोपडपट्टी धारकांना दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्यामुळे पुनर्वसन निश्चित होईल, आणि एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही, असे त्यांनी आश्वासित करून झोपडपट्टी वासियांना मोठा दिलासा दिला होता. त्यावेळी झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनासाठी पालिका आयुक्तांची भेट घेऊ, गरज भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देत तुम्हाला सर्वाना न्याय भेटेल आणि जो पर्यंत पुनर्वसनाच्या बाबतीत न्याय मिळत नाही तो झोपड्पट्टीवासियांच्या एकाही घराला हात लावू देणार नाही, असा विश्वास देत भाजप तुमच्या पाठीशी काल होता आज आहे आणि उद्याही राहील, असे आश्वासित केले होते. त्यानुसार आयुक्त मंगेश चितळे यांच्यासमवेत आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठक झाली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन हा महत्वाचा विषय असून, त्या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया होत असताना अधिकृत फॉर्मचे वाटप करताना काही राजकीय संघटनांकडून पैसे वसूल केले जात असल्याचे या बैठकीच्या माध्यमातून आयुक्त मंगेश चितळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या संदर्भात अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी परिसरांमध्ये जाऊन जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले, त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवता येणार आहे. तसेच या बैठकीत झोपडपट्टीवासीयांसाठी अधिक प्रभावी उपाययोजना आखण्याचे ठरवण्यात आले आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्वरित पावले उचलण्यावर भर देण्यात आला असून आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका झोपडपट्टीवासीयांना सुरक्षित, स्वच्छ, आणि चांगल्या राहणीमानासाठी वचनबद्ध नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे झोपडपट्टी धारकांसाठी एक महत्वाचे आणि सकारात्मक उचलले गेले आहे.