नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून ‘मॉर्निंग सायकलींग’ करताना स्वच्छता, रस्ते, दुभाजक, शाळा व इतर बाबींची सखोल पाहणी
स्वच्छतेमधील नवी मुंबई शहराचे मानांकन उंचावण्यासाठी विविध मोहीमा, उपक्रम राबवित सर्व स्तरावरुन प्रयत्न केले जात असताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नुकत्याच आठही विभागांमध्ये महामार्ग, मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे, दुर्लक्षित जागा याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. या मोहीमांतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजक यांच्या कडेला जमा झालेली माती गोळा करुन हवेतील धूळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन पाहणी करण्यास सुरुवात केली असून आज त्यांनी ऐरोली विभागातील मुख्य रस्ते व प्रामुख्याने एमआयडीसी भागातील रस्ते तसेच स्वच्छता, डेब्रिज, दुभाजक, आयलँड, रस्त्याच्या साईडपट्टया अशा विविध बाबींची पाहणी केली. विशेष म्हणजे ही पाहणी त्यांनी सायकलवरुन केली.
चारचाकी गाडीने जाताना वेगामुळे काही वेळा प्रत्यक्ष स्थितीचा अंदाज येत नाही, त्यामुळे सायकलसारखे पर्यावरणपूरक वाहन वापरुन शहरातील स्थितीचा आयुक्त कार्यालयीन वेळीच्या आधी सकाळी लवकरच नियमित आढावा घेत असतात. आज त्यांनी संबधित अधिका-यांना घेऊन कोणत्या भागाची पाहणी करणार याची पूर्वकल्पना न देता ऐनवेळी सांगत ऐरोली भागाची पाहणी केली.
सेक्टर 5 येथील टि जंक्शनपासून सुरुवात करीत अंडरपास खालून डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिसर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शाळा व एमआयडीसी रोडने ऐरोलीपर्यंतच्या पाहणी दौ-यात ठिकठिकाणी थांबत आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. शाळा परिसर तसेच अंतर्गत भागातील परिसर स्वच्छ व नीटनेटका असावा तसेच तेथील सुविधांबाबत त्यांनी निर्देश दिले.
परिसर स्वच्छतेप्रमाणेच नागरिकांना चालण्यासाठी पदपथ रिकामे असावेत हे लक्षात घेउुन पदपथांवरील अतिक्रमण काढावे, बांधकामे सुरु आहेत अशा ठिकाणी उंच पत्रे लावलेले असावेत व तेथील डेब्रीजची वाहतूक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बांधकाम व्यवसायिकाकडूनच करुन घेण्यात यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
भिंतींवरील भेगांमध्ये अथवा पदपथांच्या कडेला उगवलेली छोटी रोपे लगेचच काढून टाकावीत तसेच ज्याठिकाणी शिल्पाकृती उभारलेल्या आहेत अशा ठिकाणचे सुशोभिकरण व्यवस्थित करुन घ्यावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. रस्त्यांवर तसेच काही कॉर्नरला टाकलेले डेब्रीज उचलून घ्यावे व डेब्रीज विरोधी पथके अधिक कृतीशील करावित असेही त्यांनी निर्देशित केले. काटईकडे जाणा-या उड्डाणपूलाखाली एमआयडीसी रोडच्या दोन्ही कॉर्नरला बांबू व इतर देशी वृक्षारोपांची लागवड करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
एमआयडीसी भागातील रस्त्याचा दुभाजकामधील हिरवळीची व छोट्या झाडांची दूरवस्था पाहून नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी त्यामध्ये त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश संबधितांना दिले. अश्विन कॉरीजवळील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करुन घ्यावी व त्याभोवतालचा परिसर स्वच्छ व सुशोभित करुन घ्यावा असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
शहरातील मुख्य रस्ते हे आपल्या शहराचा आरसा असून खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आवश्यक तेथे सुधारणा तसेच त्यावरील माती उचलून हवा गुणवत्तेत सुधारणा करणे व स्वच्छता व सुशोभिकरण हे आपले प्राधान्य असले पाहिजे असे निर्देश देत केवळ पाहणी केलेल्या भागाची नाही तर शहरातील सर्वच भागांची दिलेल्या सूचनांनुसार सुधारणा तत्परतेने हाती घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले. या दौ-यात त्यांच्या समवेत शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 2 चे उपआयुक्त श्री. संतोष वारुळे, ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त श्री. अंकुश जाधव, कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे, मनोहर सोनावणे, श्री.प्रवीण गाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.