“माझे पसंतीचे सिडकोचे घर” महागृहनिर्माण योजनेच्या अंतिम दिवसात नागरिकांची झुंबड

 “माझे पसंतीचे सिडकोचे घर” महागृहनिर्माण योजनेच्या अंतिम दिवसात नागरिकांची झुंबड

सिडको गृहनिर्माण अनुभूती केंद्रात इच्छुक अर्जदारांची गर्दी


सिडकोमार्फत नवी मुंबई प्रॉपर्टी प्रदर्शनात गृहनिर्माण योजनेची थेट बुकिंग सुविधा उपलब्ध


क्रेडाई, नवी मुंबई व क्रेडाई, रायगड या संस्थांनी तांडेल मैदान, सीवूडस, नवी मुंबई येथे २४ जानेवारी ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या नवी मुंबई प्रॉपर्टी प्रदर्शनात सिडको महामंडळाने सहभाग घेतला आहे. येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलवर नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येत आहे व अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती दिली जात आहे. या प्रदर्शनातील स्टॉलवरच नागरिकांच्या सोयीसाठी अर्ज नोंदणीची तसेच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रदर्शनास भेट देताना इच्छुक अर्जदारांनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावीत असे आवाहन सिडको महामंडळातर्फे करण्यात येत आहे. 

तसेच प्रॉपर्टी प्रदर्शन केंद्रापासून सिडको गृहनिर्माण योजनेच्या साईटवर भेट देण्यासाठी विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना आपले पसंतीचे सिडकोचे घर निवडताना मदत होण्यासाठी सिडकोतर्फे योजनेतील सदनिकांचे स्वरूप पाहता यावे याकरिता खारघर, सेक्टर-१४, खारघर (पूर्व) तळोजा, सेक्टर-३७ व खांदेश्वर, सेक्टर-२८ येथे अनुभूती केंद्रांची स्थापनाही करण्यात आली आहे.  असंख्य इच्छुक अर्जदार या अनुभूती केंद्रांना भेट देत आहेत व त्यांच्या स्वप्नातल्या घराची अनुभूती घेत आहेत.

सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” महागृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासह सदनिकांचा प्राधान्यक्रम सादर करण्याकरिता दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अखेरची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तारखेपर्यंतच ही सुवर्णसंधी उपलब्ध असल्याने, सदर ऑनलाईन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी असंख्य नागरिक प्रयत्न करीत आहेत. 

सिडकोतर्फे “माझे पसंतीचे सिडकोचे घर” महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता परवडणाऱ्या दरातील २६,००० सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

दिनांक ३१ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंतच योजनेकरिता ऑनलाइन नोंदणी करण्याची व सदनिकांचा प्राधान्यक्रम सादर करण्याची शेवटची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. याकरिता अधिकाधिक अर्जदारांनी https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा व  आपल्या पसंतीच्या १५ सदनिकांचा प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.