कर्जत खालापूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांनी घेतले कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे आशीर्वाद!
उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )
सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असताना आमदारकीची स्वप्नं पाहत असलेल्या अनेक बंडखोरांनी या निवडणुकीत धुमाकूळ घातलेला आहे. यामुळे अधिकृत उमेदवारांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कॉंग्रेस -उद्धव सेना -राष्ट्रवादी शरद पवार गट व सहयोगी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांचा प्रचार करून त्यांना बहुमताने निवडूण आणण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे म्हणून कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा शेलघर येथिल निवासस्थानी पक्षाचे अधिकृत,अनधिकृत अनेक उमेदवार आशीर्वाद मागण्यासाठी येत आहेत. त्यातील अधिकृत उमेदवारांना पाठींबाचे पत्र देवून त्यांना विजयीभव आशीर्वाद महेंद्रशेठ घरत यांच्या वतीने दिला जात आहे. कर्जत -खालापूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे तरुण तडफदार उमेदवार नितीन सावंत यांनी काल सायंकाळी “सुखकर्ता” निवासस्थानी कॉंग्रेसचे कर्जत,खालापूर, खोपोली शहराचे अध्यक्षासह महेंद्रशेठ ह्यांची भेट घेतली. पुढील वाटचालीबाबत चर्चा करून जिल्हाध्यक्षांचे आशीर्वाद घेतले. यावेळी कर्जत तालुका कॉंग्रेस अध्यक्ष संजय गवळी, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, खालापूर तालुका अध्यक्ष कृष्णा पारंगे, युवक कॉंग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष निखील डवले आदी उपस्थित होते.