पनवेल मनपाने खारघरमधील चांगल्या रस्त्यांची वर्क आर्डर रद्ध करून खड्डेयुक्त रस्त्यांचे कंत्राट काढावे-सौ.लिना गरड

पनवेल मनपाने खारघरमधील  चांगल्या रस्त्यांची वर्क आर्डर रद्ध करून खड्डेयुक्त रस्त्यांचे कंत्राट काढावे-सौ.लिना गरड



खारघर(प्रतिनिधी)-एकविसाव्या शतकातील एक विकसित शहर, अशी संकल्पना घेऊन सिडको ने खारघर वसाहत विकसित केली. या ठिकाणी एज्युकेशन हब, गोल्फ कोर्स, आणि सेंट्रल पार्क सारखे आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहेत.या कॉलनीला एक वेगळे असे महत्त्व प्राप्त आहे.मात्र पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर खारघर सिटी असुविधा आणि समस्यांचे आगार बनले आहे. या ठिकाणच्या प्रशस्त रस्त्यांची खरोखर वाट लागली आहे. खड्ड्यांमध्ये रोड शोधावे लागतात ही खारघरची सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.महापालिकेमुळे सिडको ने आखडता हात घेतला.या कारणाने खारघर 'ना घर का ना घाट का'असे म्हणण्याची वेळ आली आहे. याला जबाबदार सत्ताधारी आणि प्रशासन आहे.दरवर्षी खारघर वसाहतीतील रस्ते खड्ड्यात का जातात. याचे उत्तर पनवेल महापालिकेकडे नाही.या संदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि खारघर काॕलनी फोरमच्या अध्यक्षा तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर संघटिका सौ.लिना गरड यांनी मागील वर्षी म्हणजेच 2023 च्या पावसाळ्यात या खड्ड्यांचा 'मायक्रो सर्वे' केला होता. त्यामध्ये अनेक गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. दरवर्षी 20 ते 22 ठिकाणी त्याच रस्त्यावर त्याच ठिकाणी खड्डे पडत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पूर्वी सिडको आणि आता महानगरपालिकेकडून हे खड्डे बुजवले जातात. याकरता प्रत्येक वेळी ठेकेदार नियुक्त करून पैसे खर्च केले जातात. यातून मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उधळपट्टी केली जाते. हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे.

       अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर खारघर मध्ये शेकडो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे काढण्यात आली. त्यातील शेकडो कोटी रुपयांची कामे ठाकूर कुटुंबीयांच्या टी आय पी एल या कंपनीला देण्यात आली आहेत.वर उल्लेख केल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये खारघर येथे 20 ते 22 ठिकाणी सातत्याने मोठमोठे खड्डे पडत आहेत. त्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. परंतु त्या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरणांमध्ये प्रशासनाने रस दाखवला नाही. त्यामुळे या ठिकाणी 'खड्डे आणि खड्ड्यातील रस्ते'ही समस्या पुढील वर्षीही कायम राहील. आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा ठेकेदार नियुक्त केला जाईल. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल.

ज्या ठिकाणी यापूर्वी रोड चांगले होते, खड्डे पडलेले नव्हते,अशा सेंट्रल पार्कच्या आजूबाजूचे रस्ते प्रशस्त आणि सुस्थितीत होते, तेथे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. तसेच खारघर ब्रिज ते उत्सव चौक हा गेले वीस पंचवीस वर्ष कधीही खड्डे न पडलेल्या रस्त्याचे 84 कोटी खर्च करून कॉंक्रिटीकरण करण्याचे टेंडर काढले आहे.विशेष म्हणजे याकरता ठाकूर कुटुंबीयाची टी. आय. पी. एल. ही कंपनी नियुक्त करण्यात आली. म्हणजे दरवर्षी ज्या वीस-बावीस ठिकाणी सातत्याने गेली आठ वर्ष खड्डे पडत असताना, ते रस्ते दुरुस्त न करता केवळ ठेकेदारीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कामे काढली जात असल्याने 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' असा प्रकार दिसून आलेला आहे. आमदारांच्याच कंपनीला ही कामे कशी काय मिळतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.

       विशेष म्हणजे  चार-पाच महिन्यापूर्वी ठाकुरांच्या टी आय पी एल कंपनी कडून करण्यात आलेल्या रस्त्यावर सुद्धा खड्डे पडले आहेत.खारघर सेक्टर 17 आणि 18 मधील सेलिब्रेशन सोसायटीच्या समोरील रस्त्यावर गेल्यावर तेथील दुरावस्था आपल्या निदर्शनास येईल.एकंदरीत ठेकेदार जेव्हा सत्ताधारी बनतो, तेव्हा नागरिकांचा कोणीही वाली राहत नाही. हे खारघर मध्ये दिसून येत आहे. 

      पनवेल मनपा आयुक्तांना सौ.लिना गरड यांनी लेखी निवेदनाद्वारे   विनंती केली आहे की आपला रस्ते डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण चा प्राधान्यक्रम बदला.सध्या गरज नसलेल्या ठिकाणी दिलेल्या वर्क ऑर्डर रद्द करून, ज्या ठिकाणी गेली सात-आठ वर्षे सातत्याने खड्डे पडत आहेत, ते रस्ते आणि ते चौक हे पहिले बनवून घ्या आणि नंतर इतर कामे करावी. शिवाय कॉलिटी वर्क होण्यासाठी ठेकेदारावर नजर ठेवण्यात यावी.



.