पनवेल महापालिकेत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
’डॉक्टरर्स डे’ निमित्ताने पनवेल महापालिकेच्या सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांचा सत्कार
पनवेल,दि.1 : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0 अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाचे आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या हस्ते आज दिनांक 1 जुलै रोजी आद्य क्रांतीवीर वासुदवे बळवंत फडके नाट्यगृहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वच्छतेची शपथ सर्वांनी घेतली.
यावेळी प्रमुख पाहूणे डॉ.सुप्रिया सहस्त्रबुध्दे, एमजीएमच्या डॉ.आश्लेषा तावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, मुख्य वैद्यकिय आरोग्य विभाग प्रमुख डॉ.आनंद गोसावी, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, घनकचरा व आरोग्य विभागाचे विभागप्रमुख अनिल कोकरे,पशुधन अधिकारी डॉ. भगवान गीते, डॉ. मनिषा चांडक, डॉ.आकाश ठसाळ, महापालिकेचे सर्व वैद्यकिय अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अरूण कांबळे, सर्व आरोग्य निरीक्षक, एनएम,जीएनएम आशा सेविका महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयुक्त श्री.मंगेश चितळे म्हणाले, स्वच्छता व आरोग्य यांचे केंद्र शासनाने एकत्रिकरण करण्याचे ठरविले आहे. सफाई कर्मचारी, बहुद्देशिय कर्मचारी, आशा वर्कर्सच्या या आपल्या यंत्रणे मार्फत आपण शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलो तर आपण सर्व घरांपर्यत पोहचणारआहे.यामुळे महापालिका क्षेत्रात रोगराई टाळणे शक्य होणार आहे. हा आरोग्यदायी कार्यक्रम आपण जास्तीत जास्त यशस्वी करूया असे आवाहन आयुक्तांनी केले.
यावेळी डॉ. सुप्रिया सहस्त्रबुध्दे यांनी ‘अतिसार व आरोग्य शिक्षण’ याविषयावरती मार्गदर्शन करताना म्हणाल्या कोरोना गेल्यानंतर आपण हात धुण्याचे महत्व् आपण विसरलो आहे. स्वच्छतेवरती आपण सर्वांनी भर दिला पाहिजे. आशा सेविकांनी नागरिकांना सहा सहा महिन्याला हात धुण्याचे प्रशिक्षण देऊन जनजागृती केली पाहिजे. अतिसारामध्ये पाणी महत्वाचे असून लिंबूपाणी, नारळ पाणी, ताक, ओआरएस असे पदार्थ घेणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच डॉ.आश्लेषा तावडे यांनी अतिसारामध्ये झिंक आणि ओआरएस उपयुक्त असून नागरिकांना याचे महत्व पटवून सांगितले पाहिजे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पाणी पिणे महत्वाचे आहे. यासाठी पाणी 20-25 मिनीटे उकळून पिणे, पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरीनच्या गोळ्या, मेडिक्लोर थेंब पाण्यात मिसळावे. तसेच शारिरीक स्वच्छता , हात धुण्याची पध्दत याबद्दलची माहिती त्यांनी सांगितली.
उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हणाले,आपले शहर स्वच्छ ,आरोग्यदायी राहण्यासाठी आयुक्त नेहमीच सूचना देत असतात. या अभियानाचे वेगळेपण म्हणजे केवळ घनकचरा आणि आरोग्य विभागापुरते हे अभियान मर्यादित नसून ,यामध्ये शिक्षण विभाग, वैद्यकिय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग,बांधकाम विभाग अशा सर्व विभागांचा सहभाग महत्वाचा आहे.सर्वांनी एकत्रित येऊन हे अभियान यशस्वी करूया असे उपायुक्तांनी सांगितले.
मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी म्हणाले या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना सामावून घेणे गरजेचे आहे. आशा सेविकांनी घरोघरी जाऊन या अभियानाची माहिती द्यावी. तसेच शाळाशाळांमध्ये जाऊन हात धुण्याचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकियांना दिल्या.
चौकट
दिनांक 1 जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महापालिका कार्यक्षेत्रात 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र , दोन आपला दवाखना व सहा आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या सर्व वैद्यकियअधिकाऱ्यांचा आयुक्त श्री.मंगेश चितळे व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.