व्यापक लोकसहभागामुळेच नवी मुंबई स्वच्छतेत नेहमी आघाडीवर – नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये मिळालेले उज्ज्वल यश हे सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे मिळालेले असून यावर्षी नवी मुंबई शहराने देशात व्दितीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त केला, तसेच कचरामुक्त् शहराचे सर्वोच्च सेव्हन स्टार रेटींग मिळवले, यामुळे आपली जबाबदारी वाढलेली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक जोमाने काम करुया असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये आयोजित ‘संकल्प स्वच्छतेचा’ या विशेष कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी उपस्थित नमुंमपा अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक व प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये केलेल्या वैशिष्टयपूर्ण कामांचा व उपक्रमांचा धावता आढावा घेतला. यामध्ये स्वच्छताकर्मींना एक दिवस त्यांच्या साफसफाईच्या कामापासून सुट्टी देऊन 2 ते 3 हजार नागरिकांनी एकत्र येत त्यांचे सफाईचे काम वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या विभागात केले. या उपक्रमाचा विशेष उल्लेख आयुक्तांनी केला. नवी मुंबईच्या यशात नमुंमपा अधिकारी, कर्मचारीवृंदाप्रमाणेच येथील स्वच्छताप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, उदयोजक, व्यावसायिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी, तृतीयपंथी नागरिक, प्रसारमाध्यमे अशा सर्व घटकांचा महत्वाचा वाटा असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर सुप्रसिध्द संगीतकार, गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यामार्फत स्वयंस्फूर्तीने केल्या जाणाऱ्या निरपेक्ष सहकार्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
नवी मुंबई शहरात स्वच्छता उपक्रमांमध्ये नागरिकांचा मिळणारा मोठा प्रतिसाद बघता शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळते असेही आयुक्तांनी सांगितले. या व्यापक लोकसहभागामुळेच ‘इंडियन स्वच्छता लीग’मध्ये तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड’ आपण करु शकलो असे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे अनेक अभिनव उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला.
‘संकल्प स्वच्छतेचा’ करीत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना ‘स्वच्छ भारत मिशन’ने जाहीर केल्याप्रमाणे ‘थ्री आर’ या संकल्पनेनुसार नानाविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामध्ये प्लास्टिकमुक्त सोसायटी, क्लॉथ बॅग वेंडिंग मशिन, दत्तक शौचालय, रिसायकल अँड डाइन असे वेगळे उपक्रम राबविण्यासोबतच ‘थ्री आर’ मधील ‘रिडयुस’ अर्थात कचरा कमी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत ‘ड्राय वेस्ट बँक’ उपक्रम राबविेणे, ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ सर्व झोपडपट्टयांमध्ये व गावठाणांमध्ये राबविणे, थ्री आर सेंटर्सच्या संख्येत वाढ करणे व नुतनीकरण करणे, हॉटेल्समध्ये पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंवर भर देण्याची कार्यवाही प्रभावीपणे करण्यात येणार आहे.
याशिवाय ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ च्या संकल्पनेला अनुसरुन ‘सर्क्युलर इकोनॉमी’ या विषयावर देशव्यापी परिषद आयोजित करण्याचा मनोदय असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ‘मिशन इनोव्हेशन’ उपक्रम राबवून विदयार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संधी देत स्वच्छता उपयोगी संकल्पना उपलब्ध करुन त्यांची अंमलबजवणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छता विषयक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना ‘स्वच्छश्री’ पुरस्काराने सन्मानीत करण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. स्वच्छता उपक्रमांमध्ये जनसहभागाची व्याप्ती वाढवून एनसीसी व एनएसएस विदयार्थ्यांचा मोठया प्रमाणावर सहभाग घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नमुंमपा ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण केंद्रातील विदयार्थी प्रशीत बर्फे याने अत्यंत प्रभावीपणे सादर केलेल्या स्वच्छताविषयक मनोगताचे आयुक्तांसह सा-यांनी कौतुक केले. शाहीर रुपचंद चव्हाण यांनी स्वच्छतेचा पोवाडा सादर करीत संकल्प स्वच्छतेचा उपक्रमात स्वररंग भरले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मधील यशाबद्दल सर्व संबंधित घटकांचे आभार मानत स्वच्छ सर्वेक्षण 2024 ला सामोरे जाताना सर्वेक्षणाच्या एकूण गुणांकनात 25 टक्के गुण लोकसहभागाला असल्याने देशात प्रथम क्रमांकाचा नंबर प्राप्त करण्यासाठी लोकसहभागावर व सर्वेक्षणातील लोकांच्या प्रतिसादावर अधिक भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी स्वच्छताकर्मींच्या सन्मान परंपरेत उदयान सफाई कर्मचारी आरती किनवटकर, हिराबाई मुल्ला, कविता बात्रे, ताराबाई मढवी तसेच सक्शन / जेटींग मशीनवरील कर्मचारी निलेश केदासे, अशोक पुजारी, सेल्वाराज कोंडर, तापस अधिकारी, विकी हरिजन, बाबासाहेब लांडगे, अँथनी अर्जून यांना सन्मानीत करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील व किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
विभाग पातळीवर घेण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ मंथन 3.0’ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बेलापूर विभाग कार्यालयास नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते फिरता चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत प्राप्त झालेल्या राष्ट्रीय मानांकनाची मानचिन्हे व प्रशस्तीपत्रे यांच्यासह महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त् श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त् श्री. शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, उदयान विभागाचे उपआयुक्त श्री. दिलीप नेरकर, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेंद्र इंगळे, भांडार विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.